30 टक्के घरांची वीज तोडली! बिलं थकवल्याचा फटका, तुम्ही बिल भरताय ना?

तीन महिने बिल थकवल्यास काही खरं नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सलग तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ वीज बिले न भरलेल्या ३० टक्के घरांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज खात्याची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती मुख्य वीज अभियंता रघुवीर केणी यांनी मंगळवारी म्हटलंय.

कारवाई सुरु!

सलग तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ वीज बिले न भरलेल्या ज्या ३० टक्के घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत, त्या घरांतील नागरिक परदेश, पराज्यांत किंवा दुसरीकडे घरे बांधून राहत आहेत. वीज बिल आल्यानंतरही तीन महिने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याकडून असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे थकित वीजबिलांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचा फटका वीज खात्याला बसत आहे. त्यामुळेच वीज खात्याने सलग तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ वीज बिले न भरणाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई सुरू केली आहे, असे केणी यांनी सांगितलं.

बिलं वेळेत भरा

वीज बिले न भरणाऱ्या ग्राहकांकडून वेळच्यावेळी बिले फेडली जातील याची जबाबदारी यापूर्वी मामलेदारांवर होती. पण आता वीज खात्याने त्यासाठी स्वतंत्र वसुली अधिकारी नेमले आहेत. राज्यभरात नेमलेले वसुली अधिकारी यापुढे वीज बिले वेळेत फेडली जातात की नाहीत यावर लक्ष ठेवून असतील, असेही ते म्हणाले. वीज खात्याने सुरू केलेली मोहीम पुढील काळातही कायम राहील. या मोहिमेमुळे नागरिक वीज बिलांकडे दुर्लक्ष करणार नाहीत. प्रत्येक महिन्याला वीज बिले भरतील. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होऊन त्याचा वीज खात्याला निश्चित फायदा मिळेल, असा विश्वासही केणी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यातील अनेक ग्राहक वेळेत वीज बिले फेडत नाहीत. त्यामुळे वीज बिलांचा प्रलंबित आकडा वाढून त्याचा फटका सरकारी महसूल आणि वीज खात्याला बसत आहे. त्यामुळे सलग तीन महिने वीज बिले न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्याचा निर्णय वीज खात्याने घेतला असल्याची माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. राज्यात सुमारे साडेपाच लाख वीज ग्राहक आहेत. यांतील चार लाख ग्राहक वेळेत बिले भरतात. दीड लाख ग्राहक चालढकलपणा करत राहतात. यांतील काहीजण वर्षानंतर तर, काहीजण दोन वर्षांनंतर बिले भरतात. काही जणांना वीजपुरवठा खंडित केल्यानंतरच जाग येते. अशा ग्राहकांना वेळेत वीज बिले भरण्याची सवय लागावी आणि सरकारला महसूलही मिळावा, यासाठीच ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

वीज खात्याविरोधात जनतेत असंतोष

सलग तीन महिने वीज बिले न भरलेल्यांचा वीजपुरवठा खात्याकडून खंडित करण्यात येत असल्याने घरगुती वीज ग्राहकांत खात्याविरोधात असंतोष पसरला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नियमितपणे वीज बिले भरतो. सध्या अनेकांना करोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे काहीजण तीन-चार महिने बिले भरू शकलेले नाहीत. त्यांच्या वीज जोडण्या खात्याने तोडल्या आहेत. पण दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिले न भरलेल्यांना मात्र वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) योजना देऊन ५० टक्के सूटही दिली आहे. सरकारच्या या निर्णयाने यापूर्वी नियमित वीज बिले भरलेल्यांवर अन्याय झाला आहे, असा आरोप त्यांच्याकडून होत आहे.

वीज खात्यावर नाराज असलेले अनेक ग्राहक वीज कार्यालयांत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत असल्याचे प्रकारही राज्यभरात दिसून येत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!