नर्सरी प्रवेशासाठी वय निश्चित

गोव्याच्या शिक्षण खात्याने काढलं परिपत्रक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नर्सरी या वर्गांसाठी वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. नेमक्‍या कोणत्या वयात मुलांना प्रवेश द्यायचा, याबाबत अद्याप एकवाक्‍यता नव्हती. याचा फायदा अनेक खासगी, बड्या, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळा उठवत आपली मनमानी करत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने प्रथमच पुढाकार घेत यात एकवाक्‍यता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन वर्षांवरील मुलांनाच नर्सरीत प्रवेश

याबाबत सरकारचा आदेश मंगळवारी (ता. 22) जारी करण्यात आला. त्यानुसार नर्सरीची वयोमर्यादा तीन वर्षं अशी निश्‍चित करण्यात आली आहे आणि ती नर्सरी वर्ग चालवणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांना बंधनकारक आहे. नर्सरीसाठी प्रवेश घेताना त्या वर्षीच्या 31 मे किंवा तत्पूर्वी मुलाचं किमान वय तीन वर्षं असावं. वयाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या मुलांनाच नर्सरीत प्रवेश देण्यात येईल, असं सांगत येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच (2021-2022) ही वयाची अट लागू केली जाणार असल्याचं गोवा शिक्षण खात्याने मंगळवारी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केलंय.

शिक्षण खात्याने काढलं परिपत्रक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० मधील तरतुदीनुसार नर्सरी वर्ग चालवणाऱ्या सर्व शिक्षण संस्थांनी ३ वर्षे वयाच्या मुलांना यंदाच्या म्हणजेच २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश द्यावा, असं परिपत्रक गोव्याच्या शिक्षण खात्याने काढलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!