जम्मू-काश्मीर सीमेवर 135 कोटींचं 27 किलो हेराॅईन जप्त ; बीएसएफची मोठी कारवाई !

पाकीस्तानातुन भारतात घुसणाऱ्या ड्रग्ज तस्कराचा सीमेवरच खात्मा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा सीमा सुरक्षा दलान केलाय. या कारवाईत पाकिस्तानमधील एका तस्कराला ठार करण्यात आल्याचंही बीएसएफनं म्हटलंय. या कारवाईनंतर सीमा सुरक्षा दलानं हेरॉइनचा २७ किलो साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १३५ कोटी रुपये इतकी आहे. याबाबत भारताकडं ठोस पुरावे असून पाकिस्तानच्या लष्कराकडं त्याबाबत तीव्र निषेध नोंदविण्यात येणार असल्याचं बीएसएफचे महानिरीक्षक (जम्मू) एन. एस. जमवाल यांनी सांगितलंय.

कथुआमधील सीमेवरून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आमचे जवान मोक्याच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. पहाटेच्या सुमाराला संशयास्पद हालचाली दिसल्या. तस्कर सीमेजवळ आले होते. जवानांनी त्यांना इशारा दिला. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर जवानांनी गोळीबार केला त्यामध्ये एक तस्कर ठार झाला. सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली तेव्हा या तस्कराचा मृतदेह आणि त्याच्याकडील २७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले.

दरम्यान, एनसीबीनं नुकत्याच मुंबई आणि ठाणे इथं राबवलेल्या धडक मोहिमेत 17.3 किलो इतकं चरस जप्त करून सात जणांना बेडया ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ तस्करीचं अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आलं होतं. त्यामुळं अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही ठाणे कारागृहातुन एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. या एकुणच घडामोडींमुळं हे ड्रग्ज पाकीस्तानातुन काश्मिरमार्गे थेट मुंबईत पोहोचत असल्याचं स्पष्ट होतंय. आता या संपुर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचं आव्हानं एनसीबीसमोर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!