मुंबई हल्ल्यातील शहिदांना 26 रोजी आदरांजली

पणजी येथील आझाद मैदानावर विशेष कार्यक्रम

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई वरील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शहीदांना पणजी येथील आझाद मैदानावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात येणार असून यात राज्यातील अनेक संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनंत जोशी यांनी दिली.

अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेने 26 नोव्हेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता 26 नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शुरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी नावाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील यूथ होस्टेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती देताना जोशी म्हणाले, 26 नोव्हेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर पणत्या पेटवून आणि हुतात्मा स्मारकावर फुले वाहून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. पाकिस्तानने आजही दहशतवादाला खतपाणी घालणे सुरुच ठेवले असून भारतीय सेना आणि भारतीय त्याचा बिमोड करून पाकिस्तानला धडा शिकवण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानने त्याचा अनुभव घेतला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद केले नाही तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागल्याशिवाय राहणार नाही.

26 नोव्हेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर होणाऱ्या जरा याद करो कुर्बानी कार्यक्रमात माजी सैनिक कल्याण मंडळाचे सचिव मेजर वेणुगोपाल नायर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पणजी मनपा, गुज, सम्राट क्लब पणजी, रोटरी क्लब पर्वरी, रोटरी क्लब मीरामार, लायन्स क्लब पणजी, यूथ होस्टेल मीरामार, गोवा असोसिएशन, जय हिंद फाउंडेशन या संघटना सहभागी होणार आहेत.

ज्या देशप्रेमी नागरीकांना यावेळी उपस्थित राहून आदरांजली वाहायची आहे, त्याचे देखील स्वागत आहे, असे जोशी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!