धक्कादायक ! गोयकारांना दोडामार्गात लस नाकारली

...मग गोव्यातही उपचार नाकारायचे का? गोमंतकीयांचा सवाल !

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग : गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातल्या दोडामार्ग इथं गोव्यातल्या नागरीकांना लसीकरण नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पोर्टलवर रितसर नोंदणी करून अपाॅईंटमेंट घेतल्यावरही लस नाकारल्यानं गोमंतकीयांतुन संताप व्यक्त होतोय. महाराष्ट्रातल्या अनेकांवर गोव्यात उपचार होतात, ते आता नाकारायचे का, असा सवालही आता गोमंतकीयांनी केलाय.

सध्या 18 ते 44 वयोगटातल्या नागरीकांना दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रावर पोर्टलवरील अपॉइंटमेंट नुसार लस देण्यात येतेय. मात्र महाराष्ट्रातील पत्ता नोंद असलेल्या आधारकार्ड धारकांनाच लस देण्याचे आदेश आल्यानं तालुका आरोग्य विभागानं आजपासून गोमंतकीयांना लस नाकारली. त्यामुळं रितसर नोंद करून अपॉइंटमेंटनुसार लस घेण्यास आलो असता लस नाकारणे चुकीचं असल्याचं गोमंतकीयांनी स्पष्टपणे सुनावलं. अगोदर कल्पना का दिली नाही? गोव्यात महाराष्ट्रातील रुग्णांना गोवा सरकार उपचार नाकारते का? गोवा सरकारने मग तसा निर्णय घ्यावा का ? निदान लस द्यायची नव्हती तर अपॉइंटमेंट तरी कशासाठी द्यायची आणि अपॉइंटमेंट दिली तर लस देणार नाही, ही पूर्वसूचना कोण देणार? असे अनेक प्रश्न लस नाकारलेल्या गोमंतकीय नागरिकांनी उपस्थित केलेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी म्हणतात, आपल्याला डिएचओंचे तसे आदेश आहेत. फक्त महाराष्ट्र राज्याचा पत्ता असलेल्या आधारकार्ड धारक नोंदणीधारकांना ही लस दिली जाणार आहे. याबाबतचे फलकही लसीकरण केंद्रावर लावण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना महाराष्ट्र सरकारनं मोफत लस दिल्यामुळं ती फक्त महाराष्ट्रातील नागरीकांनाच दिली जाईल. 45 वर्षांवरील नागरीकांना केंद्राकडून लस प्राप्त झाल्यामुळं ती भारतातील कोणत्याही नागरीकाला देण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!