१२५ कोविडबळींच्या कुटुंबांना आज प्रत्येकी २ लाख : मुख्यमंत्री

कोविड मृत्यू अहवाल न मिळालेल्यांनाही अर्ज सादर करण्याचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काेविडमुळे मृत्यू झालेल्या १२५ नागरिकांच्या कुटुंबियांना शुक्रवारी प्रत्येकी २ लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात येणार आहेत. कोविड मृत्यू अहवाल न मिळालेल्यांनीही तत्काळ समाजकल्याण खात्याकडे अर्ज सादर करावे. त्यांनाही आर्थिक सहाय्य करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचाः दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ची सक्ती नको!

काही महिन्यांपूर्वी केली होती घोषणा

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली होती. त्यानंतर त्यासंदर्भातील अर्जही उपजिल्हाधिकारी कार्यालयांत उपलब्ध करण्यात आले होते. पण आतापर्यंत केवळ १२५ अर्जच सरकारकडे आले आहेत. बऱ्याच कुटुं​बियांना मृत्यू प्रमाणपत्र सादर करून कोविड मृत्यूचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज सादर केलेला नाही. पण, ज्यांना मृत्यू प्रमाणपत्र सादर करूनही अद्याप अहवाल मिळालेला नाही अशांनीही दोन लाखांच्या अर्थसहाय्यासाठी अर्ज सादर करावे. सरकार त्यांनाही आर्थिक मदत देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य सरकार जनतेप्रती संवेदनशील

राज्य सरकार गोमंतकीय जनतेप्रती संवेदनशील आहे. प्रत्येक नैसर्गिक संकटावेळी सरकार गोमंतकीय जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहे. राज्यात आलेल्या पुरामुळे ज्यांचे संसार, घरे, शेती उद्‌ध्वस्त झाली, अशांना सरकारने प्रत्येकवेळी मदतीचा हात दिलेला आहे. यापुढेही राज्य सरकार जनतेला आवश्यक त्यावेळी पूर्ण मदत करेल, अशी हमी त्यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य सरकारला आर्थिक मदत मिळाली का असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून अजून राज्य सरकारला मदतनिधी मिळालेला नाही. पण, त्यांच्या विनंतीनुसार राज्य सरकारने पुरावेळी झालेल्या आर्थिक हानीची माहिती पत्राद्वारे दिली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडून गोव्याला लवकरच मदतनिधी मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

हेही वाचाः ACCIDENT | सुकतळे – मोले येथे अपघात

पारंपरिक व्यावसायिकांसाठीचे अर्ज आजपासून वितरित

कोविडमुळे आर्थिकदृष्ट्या बिकट स्थितीत सापडलेल्या पारंपरिक व्यावसायिकांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यासाठीचे अर्जही शुक्रवारपासून वितरित केले जाणार आहेत. राज्यातील पारंपरिक व्यावसायिकांना मदतीचा हात देऊन कोविडमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यावर सरकार भर देत आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.

हा व्हिडिओ पहाः FENNY | SPECIAL COVER | पोस्टातर्फे काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’ प्रकाशित

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!