मडगावात १९ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू

नागरिकांमध्ये भीती : इस्पितळांतील रुग्णसंख्याही वाढतीच

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : कोविडचा नवा विषाणू आता तरुणांना लक्ष्य करू लागला असून गुरुवारी या विषाणूने आकें येथील १९ वर्षीय तरुणीचा बळी घेतला आहे. याशिवाय चोवीस तासांत १४६ नव्या रुग्णांची भर पडल्याने येथील सक्रिय बाधितांची संख्या १ हजार ९७४ इतकी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहेत. हळुहळू मृतांचा आकडा हा चढ्या दिशेने चाललाय. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण पसरलंय. गुरुवारी राज्यात तब्बल 36 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 1 हजाराच्या पुढे गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 1146 रुग्ण दगावले आहेत. रोजची वाढणारी ही आकडेवारी घाबरवून सोडणारी आहे.

मडगाव पालिकेची निवडणूक झाल्यानंतर पालिका क्षेत्रातील करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी आरोग्य खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. यात आकें येथील १९ वर्षीय युवतीचा समावेश आहे. या युवतीला अन्य कोणताही आजार नसल्याचेही अहवालात नमूद असल्याने केवळ कोरोनामुळे युवतीचा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आरोग्य खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारी बाळ्ळीत ३८१, चिंचणीत २७७, कुडतरीत ३६३, कासावलीत ८१२, लोटलीत ३४३ व नावेलीत ३३१ सक्रीय रुग्ण आहेत.

corona update
corona update

निवडणुकांनंतर वेग आणखी वाढला

निवडणुकांसोबतच लॉकडाऊनच्या बातमीमुळे खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळेही करोनाच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने काढलेल्या पत्रकात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी १८ एप्रिल रोजी गैरवर्तन झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर इस्पितळात ४ पोलीस कर्मचारी व पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ४०० खाटांची सोय असून या सर्व खाटा रुग्णांनी भरल्याने काहींना जमिनीवर गादी घालून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ४५६ एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ईएसआय इस्पितळातील खाटांची संख्या दीडशेवरून १९० एवढी वाढवण्यात आलेली आहे. तरीही ईएसआय कोविड इस्पितळात केवळ चारच खाटा रिक्त असून १८६ खाटांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांना त्यांच्यावरील वाढता ताण लक्षात घेत काळजी घेण्याची व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत घरीच राहण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!