‘पी ३०५’ तराफ्यावरील १८६ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका ; २६ जणांना जलसमाधी

गॅल कन्स्ट्रक्टर या तराफ्यातले १३७ कर्मचारी आणि एसएस-३ इथं अडकलेल्या १९६ जणांना नौदल, तटरक्षक दलानं वाचवलं !

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ या तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी सापडले. नौदलाने आतापर्यंत या तराफ्यावरील १८६ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली असून, अन्य ४९ जणांचा शोध सुरू आहे.

नौदल, तटरक्षक दलाची धाडशी शोधमोहीम

तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्याने अरबी समुद्रात ‘पी ३०५’, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन तराफे तसेच सागर भूषण तेलफलाट भरकटला. नौदलाने मोठी शोधमोहीम राबवत ‘पी ३०५’ तराफ्यातील १८६ जणांची सुखरूप सुटका केली, तसेच अन्य दोन तराफे आणि तेलफलाटावरील अन्य ४३४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. चक्रीवादळामुळे सोमवारी बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला.या तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट परिधान करून समुद्रात उड्या मारल्या. त्यातील १८० कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. उर्वरित बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध मंगळवारी रात्रीपर्यंत लागला नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी दिवसभरात आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळाले.

49 जणांचा शोध सुरू
त्यातील सहा कर्मचारी ‘पी- ३०५’ तराफ्यावरील असून, दोघेजण ‘वरप्रदा’ नौकेवरील आहेत. ‘पी-३०५’ तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले. अद्याप ४९ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. आय.एन.एस. कोची ही युद्धनौका सुखरूप सुटका केलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन बुधवारी सकाळी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे दाखल झाली.

‘पी ३०५’ या तराफ्याशिवाय गॅल कन्स्ट्रक्टर या तराफ्यात १३७ कर्मचारी आणि एसएस-३ येथे १९६ जण अडकले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना नौदल आणि तटरक्षक दलाने वाचवले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!