कोरोनाच्या लढाईत आजवर 1300 डॉक्टरांचा मृत्यू ; सर्वाधिक संख्या दिल्लीत

दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशात मृत्यूचं प्रमाण 45 टक्के ; गोव्यात एका डॉक्टरांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या या लढाईत आपले प्राण पणाला लावून जीव वाचवण्यासाठी देवदूतासारखे काम करताहेत ते डॉक्टर्स. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. आयएमएकडून राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला असून यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याचं आयएमएने सांगितलं आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे तर गोव्यातल्या एका डॉक्टरांचा समावेश आहे.

दरम्यान, योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना आयएमएने खुलं पत्र लिहिलं असून त्यांनी कोरोनाविरोधातील सरकारच्या लढाईला नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी देशातील लोकांमध्ये कोरोनासंबंधी प्रोटोकॉल आणि लसींसंबंधी गोंधळ निर्माण केला असल्याचं सांगत आयएमएने ही देशविरोधी भूमिका असल्याचा उल्लेख केला आहे.

रामदेव बाबा यांनी आपल्या वस्तूंच्या प्रसिद्धीसाठी संधी साधत कोरोना उपचारांवरील प्रोटोकॉल आणि लसीकरण मोहिमेविरोधात ही वक्तव्यं केली असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. सध्याच्या आणि माजी १४ अध्यक्षांची स्वाक्षरी असणाऱ्या या पत्रात रामदेव बाबा यांनी कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या भारत सरकारच्या प्रयत्नांना नुकसान पोहोचवलं असल्याचं म्हटलं आहे. रामदेव बाबा यांच्याविरोधात देशद्रोह तसंच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी आयएमएने केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!