खैराच्या तस्करीत गुंतलेल्या ११ जणांना अटक

वन विभागाची धारबांदोडा येथे कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : तामसडो-धारबांदोडा येथून खैराच्या झाडाची तस्करी करण्यात गुंतलेल्या ११ जणांना कुळे वन विभागाने गजाआड केले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदेश सूर्यकांत नाईक याला यापूर्वी फोंडा, केरी व पेडणे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अशाच प्रकरणात अटक केली होती. सोमवारच्या कारवाईत संशयितांकडून १ लाख रुपयांच्या खैराच्या लाकडांसह बनावट क्रमांकपट्टी लावलेली सुमो कार जप्त करण्यात आली आहे.

वरील प्रकरणात मुख्य सूत्रधारासह अटक केलेल्या संशयितांमध्ये यल्लापूर-कर्नाटक येथील मारुती कात्रोत (३०), विठ्ठल धाकलु पाटकरे (२२), जानू शामु पाटकरे (३४), मांबू बाबू पाटकरे (३०), लक्ष्मण साहू पाटकरे (३०), संदीप बाबू जंगले (१९), रामू सोनू पाटकरे (२१), योगेश दोंडू पाटकरे (२०) तसेच सैफ शेख (२७, रा. मोर्ले-सत्तरी) व असिफ अश्रफ शेख (२८, रा. केरी-सत्तरी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून खैराच्या लाकूड आणि सुमोसह स्कॉर्पिओमध्ये ठेवलेली ४ लाखांची रोकड, एक कटर, एक एअर पिस्तूल, दोन अंगठ्या व एक सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.
तामसडो येथे सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता वन कर्मचाऱ्यांनी जाऊन तपासणी केली असता वरील प्रकार उघडकीस आला. त्या ठिकाणी बनावट क्रमांकपट्टी लावलेल्या जीए-०४सी-३२९६ क्रमांकाच्या सुमो कारमध्ये ७ मजूर खैराची लाकडे भरत होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुख्य सूत्रधार संदेश नाईक याचे नाव समोर आले. वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी मुख्य सूत्रधाराला फोनवरून सुमो बिघडल्याची माहिती दिली. त्यानुसार तीन साथीदारांना घेऊन संदेश मध्यरात्री १२.३० वाजता जीए-०१आर-७३८७ क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन धारबांदोडा पंचायत कार्यालय जवळ पोहोचला असता तेथेच त्याच्या मुसक्या आवळल्या.

खैर वृक्षाचा वापर

खैर या झाडाच्या नारापासून काथ, गुटखा, रंग तयार केला जातो. त्यामुळे खैराच्या नाराला मोठी मागणी आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये मुखविकार, डायरिया यावर औषध म्हणून काथ वापरला जातो. तसेच तोंडाला चव आणण्यासाठी, दात, त्वचा आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी काताचा वापर करतात. काथ कफ कमी करून गळा साफ करतो. अतिसार, आमांश पोटात दुखणे इत्यादींसाठीही काताची पूड मधासह घेतात. अधिक वेळा लघवी होत असल्यास कातपूड वापरली जाते. 

         

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!