मृत्यूदराचं संकट गडद, मंगळवारी ७५ बळी, ११ दिवसांत ६३६ मृत्यू

कोरोनाचा राज्यातील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गडद

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. मृत्यूदर आटोक्यात येत नसल्याचं मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. मंगळवारी एकूण ७५ जण कोरोनामुळे दगावले आहेत. कोरोनामुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची धक्कादायक आकडेवारी चिंतेचा विषय ठरु लागली आहे. मे महिन्याच्या ११ दिवसांत तब्बल ६३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्या ३३ हजार ५२२ रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या ११ दिवसांत राज्यात २३ हजार १९२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

सरासरी काय सांगते?

मे महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांची जर सरासरी काढली तर दर दिवशी एकूण २१०० पेक्षा जास्त नवे रुग्ण हे कोरोनातून बरे होत असले, तर ३ हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर पडत चालली आहे. चिंताजनक बाब म्हणजे ११ महिन्यांच्या आकडेवारीनुसार राज्यात दर दिवशी ५८ जणांच्या मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब असून एप्रिल महिन्याच्या मध्यापासून सुरु झालेला कोरोनाचा कहर राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.

११ मे रोजी काय झालं?

11 मे रोजी राज्यात तब्बल ७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान मंगळवारी २ हजार ४७५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर ३ हजार १२४ नव्या कोरोना रुग्णांची भर मंगळवारी राज्यात पडली आहे.

पाहा ११ दिवसांची सविस्तर आकडेवारी

दरम्यान, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार बरे झालेल्या रुग्णांची संख्याही देशभरातील नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

किती नवे रुग्ण – ३ लाख ४८ हजार ४२१
किती बरे झाले? – 3 लाख ५५ हजार ३३८
मृत्यू – ४ हजार २०५
एकूण कोरोना बळी – २ लाख ५४ हजार १९७

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!