तब्बल 1 कोटी नोकऱ्या गेल्या…97 टक्के कुटुंबांचं उत्पन्न घटलं !

दुसऱ्या लाटेचा 'प्रताप';‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ संस्थेच्या पाहणीत धक्कादायक आकडेवारी समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय टाळला असला, तरी जवळपास सगळ्याच राज्यांनी कमी अधिक प्रमाणात निर्बंध लादले. याचा परिणाम अर्थचक्रावर झाला असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं तब्बल १ कोटी नोकऱ्यांचा घास घेतला. इतकंच नाही, तर देशातील ९७ टक्के कुटुंबांचं उत्पन्नातही घट झाली आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेनं देशातील १ लाख ७५ हजार कुटुंबांची पाहणी केली. त्यातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे मुख्याधिकारी महेश व्यास यांनी पीटीआयशी बोलताना बेरोजगारीत झालेल्या वाढीबद्दल माहिती दिली. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने देशातील एक लाख ७५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण केलं. यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असल्याची माहिती व्यास यांनी दिली.

पहिल्या लाटेत कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पहिल्या लाटेतून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यातही बेरोजगारी वाढली असल्याचं दिसून आलं आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चे व्यास याविषयी बोलताना म्हणाले की, देशात दुसऱ्या लाटेमुळे १ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरी लाट हे मुख्य कारण असल्याचंही त्यांनी म्हटलं. लॉकडाउनमधून अर्थव्यवस्था खुली होत असतानाच लाट आली. त्यामुळे बेरोजगारीची समस्या पूर्णपणे सुटली नाही. गेल्या वर्षी म्हणजेच मे २०२० मध्ये लॉकडाउनमुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर पोहोचला होता. दुसरी लाट आल्यानंतर अनेक राज्यांनी निर्बंध लादले, त्याचा परिणाम थेट अर्थचक्रावर झाला आहे.

ज्या लोकांना नोकरी गमवाव्या लागलेल्या त्यांना पुन्हा नोकरी मिळवण्यात प्रचंड अडचणी येत आहे. असंघटित क्षेत्रात रोजगार निर्मिती सुरू झाली. मात्र संघटित आणि चांगल्या दर्जाच्या नोकरीच्या संधी निर्माण होण्यात साधारणतः वर्षभराचा कालावधी तरी लागतो, असं व्यास यांनी स्पष्ट केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!