२६ जानेवारीला क्रांतिवीर दिपाजींच्या क्रांतीला मुख्यमंत्र्यांची मानवंदना
26 जानेवारी हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समिती क्रांती दिन म्हणून नाणूस किल्ल्यावर साजरा करत आहे.

ऋषभ | प्रतिनिधी
२४ जानेवारी २०२३ : HISTORY OF GOA, FREEDOM FIGHTER, KRANTIVEER DIPAJI RANE , FORTAEIZA DE NANUS

आज या किल्ल्याचे अतिशय अल्प अवशेष अस्तित्व दाखवत उभे आहेत
वाळपई : २६ जानेवारी १८५२ ला नाणूस किल्याच्या साक्षीने क्रांतिवीर दिपाजी राणे यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामातील पहिली सशत्र क्रांती पोर्तुगीजांविरोधात सत्तरीत केली. युवापिढीला इतिहासाची जाणीव व्हावी आणि ह्या क्रांतीची मशाल अनेकांच्या मनात सदैव तेवत राहावी म्हणून 26 जानेवारी हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समिती क्रांती दिन म्हणून नाणूस किल्ल्यावर साजरा करत आहे.

या क्रांतीला आता गोवा सरकारने मान्यता दिली असून. येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नाणूस किल्यावर उपस्थित राहून दिपाजी राणेंच्या क्रांतीला मानवंदना देणार आहेत. राष्ट्र भक्तीने प्रेरित असा हा कार्यक्रम आहे. या बाबत माहिती देताना सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अँड शिवाजी देसाई यांनी सांगितले की मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे आमदार असताना त्यांनी सर्व प्रथम क्रांतिवीर दिपाजी राणे यांचे नाव वाळपई च्या सरकारी इस्पितळास द्यावे या करीता गोवा विधानसभेत ठराव संमत केला होता. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे क्रांतिवीर दिपाजी राणे ,दादा राणे तसेच सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासाचे चलचित्र गोवा सरकारने गोवा स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षात सर्वांसमोर आणले होते. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सुरवातीपासूनच नाणूस किल्ला संवर्धन मोहिमेस सहकार्य केले आहे. सत्तरी इतिहास संवर्धन समिती त्यांचे आभार व्यक्त करते.

नाणूस किल्ला मोहीम

नाणूस किल्ला मोहीम ही अनेक इतिहास प्रेमींना पर्वणी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरी इतिहास संवर्धन समितीने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे क्रांतिवीर दिपाजी राणेंचे कार्य उजेडात आले . गोवा हीरक महोत्सवी वर्षात क्रांतिवीर दिपाजी राणेंच्या इतीहासावर राष्ट्रीय स्तरावर वेबनार सादर करण्याची संधी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अँड शिवाजी देसाई यांना प्राप्त झाली.

ह्या किल्याचा पर्यावरण दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.तसेच क्रांतिवीर दिपाजी राणेंचे नाव वाळपई च्या सरकारी इस्पितळाला देण्यात यावे ही मागणी इतिहास सनवर्धन समिती सातत्याने करत आहे. हा विषय विधानसभेत पोचला होता तेव्हा दिपाजींच्या पुतळ्यासाठी जागा दाखवा असे सरकारने सांगितले होते. नाणूस किल्यावर दिपाजी राणेंचे भव्य दिव्य स्मारक बांधून किल्याचे पुनर्वसन करता येऊ शकते. दिपाजींचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते. क्रांती दिन कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्तरी इतिहास संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मानवंदना कार्यक्रमास किल्यावर जाण्यासाठी बेतकेकर वाडा नाणुस येथून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.


सत्तरी तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रांतिवीर दिपाजी राणे यांचे पणतू दिपाजी राणे यांनी सांगितले की आम्ही मुक्यमंत्र्यांचे आभारी आहोत. कारण हा किल्ला आज खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून मुक्त होत आहे. आम्हास मुख्यमंत्र्यांचे सहकार्य नेहमी लाभले आहे