सुट्टीचा रविवार ठरला घातवार ! एकाच परिवारातील चौघे बुडाले; केरी -पेडणे येथील काळजाचा ठाव घेणारी घटना

एकाच परिवारातील 4 सदस्यांचा दुर्दैवी अपघात. सेल्फी काढताना काळाने घातला घाला.

ऋषभ | प्रतिनिधी

तेरेखोल, केरी-पेडणे: रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. रविवारी राज्यातल्या किनाऱ्यांवर गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील पर्यटकांची रेलचेल ही असतेच असते. किनाऱ्यावर पर्यटक येतात, मौजमजा करतात आणि परत जातात. पण कधी तरी कुणी असाच नाशिबाच्या फेऱ्यात अडकतो आणि आपल्या जिवास मुकतो.

आज रविवार 23 एप्रिल 2023 रोजी तेरेखोल, केरी-पेडणे येथे सुट्टीच्या दिवशी मौजमजा करण्याकरिता किनाऱ्यावर अंदाजे दुपारी 3 च्या दरम्यान 23 जणांचा परिवार आला होता. सदर परिवारातील 4 व्यक्ति इतर सदस्यांच्या नजरा चुकवून अत्यंत धोकादायक अशा अपघातप्रवण क्षेत्र सी रॉक जवळ सेल्फी काढण्याकरिता गेल्या. सेल्फी काढत असतानाच पाय घसरून दोघेजण लाटांसह वाहून गेले. त्यास वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोघेही जोरदार लाटांच्या फेऱ्यात वाहून गेले.

अपघात घडला त्या ठिकाणी “धोकादायक क्षेत्र” असा बोर्ड असूनही त्यास सातत्याने पर्यटकांकडून नजर अंदाज केले जाते, असे स्थानिकांचे मत आहे. तर पर्यटकांनी किनाऱ्यावर भान ठेवून वागावे असेही मत एका अन्य नागरिकाने व्यक्त केले.

शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सायंकाळ पर्यन्त 4 पैकी 2 जणांचे मृतदेह सापडले होते. बाकी दोघांचा शोध सुरू आहे. जलसमाधी मिळालेल्यांची नावे अनुक्रमे ‘वकील अली’ (वय वर्षे 25 ) आणि ‘सकीना खातून’ ( वय वर्षे 17 ) असे आहे. तर अन्य दोघे तबस्सुम खातून (वय वर्षे 12) आणि मुहम्मद अली (वय वर्षे 16) यांचा अध्याप सुगावा लागू शकलेला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!