सावईवेरेच्या कु. आंचलला डॉक्टर बनायचंय, पण…

मंत्री गोविंद गावडेंच्या मदतीने हायर सेकंडरीत प्रवेश, पुढच्या शिक्षण खर्चाच्या तरतुदीचे कुटुंबासमोर आव्हान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तीला मोठेपणी डॉक्टरच बनायचंय. तीनं तसा निश्चय केलाय. नुसता निश्चयच करून ती थांबली नाही तर ती झपाटलीए. कुटुंबातील आर्थिक चणचण, ट्यूशन क्लासेसला जाण्याचीही सोय नाही तरीही तीने केवळ आपल्या जिद्धीवर आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या बळावर दहावी परीक्षेत 95 टक्के गुण मिळवले. आपल्या स्वप्नपूर्तीच्या पात्रता परिक्षेत ती उत्तीर्ण झाली खरी पण पुढचा प्रवास मात्र खरोखरच खडतर आहे. केवळ गुण मिळाले आणि प्रबळ इच्छाशक्ती असली म्हणून काही सगळीच स्वप्ने खरी होतात असं नाही. डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांना आर्थिक पाठबळाचीही साथ हवी. आता करणार काय, कुठून फीचे पैसे जमा करणार आणि केवळ फीचे पैसे जमा केले म्हणून होत नाही तर बारावीनंतरच्या अभ्यासासाठीचीही तरतुद आत्ताच करावी लागेल. शेवटी प्रामाणिक इच्छा असणाऱ्यांच्या पाठीमागे कुठेतरी देवही असतो असं म्हणतात. तेच घडलं आणि आत्ता सगळं काही घडून येतंय असंच दिसतंय. तरिही तीला हवी आहे मदत भक्कम पाठींब्याची आणि तीची ही जिद्ध पाहता ही मदत देखील तिला निश्चितपणे प्राप्त होईल,असंच वाटतं.

सावईवेरे- वेलकसवाडावरचं गिरोडकर कुटुंबिय

फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघात सावईवेरे हा गांव येतो. ह्याच सावईवेरेच्या वेलकसवाड्यावर हे गिरोडकर कुटुंब राहतं. आई अनुजा, मोठी बहिण आकांक्षा आणि सर्वांत लहान कु.आंचल अरूण गिरोडकर. नगर प्रियोळ येथील सेंत्रो एदोकादोर शिक्षण संस्थेच्या शिक्षा सदन हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली कु. आंचल गिरोडकर दहावीत 95 टक्के गुण प्राप्त करून हायस्कूल आणि मंगेशी केंद्रात प्रथम आली आणि अचानकपणे हे गिरोडकर कुटुंबिय चर्चेत आले. आंचलचे वडिल अरूण गिरोडकर याची एक फेब्रीकेशन शेड कुंडई औद्योगिक वसाहतीत आहे. तिथे काम करून तो आपलं कुटुंब चालवायचा. गणेशोत्सवात खऱ्याखुऱ्या रानटी फळे आणि फुलांच्या मोटोळीची एक वेगळीच परंपरा सावईवेरेत आहे. अरूण गिरोडकर याचं माटोळी स्पर्धेतील बक्षिस ठरलेलं. अशाच एका गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी माटोळीचे सामान आणण्यासाठी म्हणून तो बाहेर पडला आणि अघटीत घडले. तिथे झाडांवरील फळे काढताना त्याच्या हातातील लोखंडी दांड्याचा स्पर्श विद्यूतवाहिनीला झाला आणि तो गतप्राण झाला. 2017 सालच्या या आकस्मिक घटनेमुळे गिरोडकर कुटुंबावर आकाशच कोसळले. अरूण गेल्यानंतर त्याची पत्नी आणि दोन मुलींचा खडतर प्रवास सुरू झाला आणि तो आजतागायत सुरू आहे.

शिक्षणासाठी आईची झुंज

आपल्या दोन्ही मुलींना शिक्षणात अजिबात कमी राहता कामा नये या इर्षेने अरूणची पत्नी अनुजा हीने कंबर कसली. अरूणची फेब्रीकेशनची शेड भाडेपट्टीवर देऊन तिथून जे काही भाडं मिळायचं त्यातून हे कुटुंब गुजराण करायचं. पण एकही भाडेकरू तिथं टीकत नसल्यामुळे वारंवार अडचणींचा अडथळा निर्माण व्हायचा. श्रीमती अनुजा ही खाजगी दुकानावर नोकरी करतेय. कु. आंचलची मोठी बहिण संगीत महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकतेय. ती आणि कु. आंचल ही दोघीही शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन वर्ग घेत असत आणि त्यातून किमान आपल्या शिक्षण आणि प्रवासाचा कसाबसा खर्च काढत असत. आपली आई आपल्यासाठी करत असलेल्या परिश्रमाची पूर्ण जाणीव या दोन्ही मुलींना आहे आणि त्यातूनच चांगले शिक्षण घेऊन कुणीतरी बनून तीची इच्छा पूर्ण करण्यासाठीच या दोन्ही भगिनी वावरताहेत.

निकाल झाला पुढे काय…

फोंडा येथील आदर्श हायर सेकंडरीमध्ये कु.आंचलने प्रवेश घेतलाय. ह्याच हायर सेकंडरीने आकाश क्लासेसकडे करार केला आहे. बारावीनंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू इच्छीणार्या विद्यार्थ्यांसाठी इथे खास प्रशिक्षण दिले जाते. यासाठीची फि मात्र अनेकांना परवडणारी नसते, तरीही कुठलेही पालक आता आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अजिबात कमी करत नसल्याचा अनुभव आहे. कु. आंचलसमोर ह्याच फीचे आव्हान उभे होते. प्रवेश फी आणि त्यात खाजगी क्लासेसची फि मिळून होणारी रक्कम कशी तयार होईल, या चिंतेने हे कुटुंब होते. कु.आंचलच्या मामांनी तीच्यासाठी प्रयत्न चालवले होते. अशावेळी कुणीतरी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याकडे जाण्याची शिफारस केली. त्याप्रमाणे कुं. आंचलचे मामा तीला घेऊन गोविंद गावडे यांच्याकडे गेले. कु.आंचलची जिद्ध आणि परिस्थिती पाहील्यानंतर गोविंद गावडे यांनी जराही उसंत न करता आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण मदत करू, अशी हमी दिली. पहिल्या टप्प्यात तीच्या प्रवेशासाठीची सोय करून तिचा प्रवेश सुकर केला.

उडान घेण्यासाठी हवे पंखांना बळ

प्रियोळचे आमदार आणि कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी कु.आंचलच्या विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आवश्यक आर्थिक मदत करून तिला मोठा आधार दिला. डॉक्टर बनायचं असेल तर बारावीत तशाच पद्धतीनं गुण प्राप्त करावे लागतील तरच पुढे प्रवेश शक्य आहे. या सगळ्या आव्हानांची पूर्ण जाणीव कु. आंचलला आहे. बारावीपर्यंतच्या खाजगी क्लासेसची फि, पुढच्या शिक्षणासाठीची तरतुद अशी अनेक आव्हाने गिरोडकर कुटुंबियांसमोर आहेत. कु. आंचलचे मामा त्यासाठी प्रयत्न करताहेत. गोविंद गावडे यांच्या मदतीमुळे तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तिच्या मामांनी तिला धीर दिला आहे. कुठूनही मदत मिळवून आणू पण तीला तिचं स्वप्न पूर्ण करायला अजिबात कमी करणार नाही,अशी जिद्ध त्यानी दाखवली आहे.

हवी आहे तुमची साथ

सावईवेरेच्या कु. आंचलची ही धडपड आणि तीची जिद्ध अजिबात निष्फळ ठरता नये. समाज म्हणून तीला साथ देणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. आज आपल्याकडे दातृत्वाची अजिबात कमी नाही. पण अनेकवेळा या दातृत्वाचाही चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा कारणांमुळे प्रामाणिक गरजवंतही अनेकदा मदतीपासून वंचित राहतात. कु. आंचलच्या कुटुंबाला अशावेळी जर कुणी मदत करू शकला. तीच्या पुढच्या संपूर्ण शिक्षणाची सोय होईल,अशी हमी तीला मिळाली तर खऱ्या अर्थाने तीचा आत्मविश्वास वाढेल आणि ती अधिक एकाग्रतेने आणि समर्पितपणे अभ्यासावर लक्ष देऊ शकेल. कु. आंचलला जर कुणी मदत करू इच्छीत असेल तर त्यांनी तीचे मामा (7038490154) या क्रमांकावर संपर्क करावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!