साखळी-फोंडा पालिका निवडणूक : साखळीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व तर फोंड्यातही विजयाचा डंका

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट : फोंडा-साखळी नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज रविवार 07 मे 2023 रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणास लागली होती. आणि अपेक्षेप्रमाणेच दोन्ही पालिकांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या. अनेक धक्कादायक निकाल यावेळी पहावयास मिळाले. यात साखळी पालिकेच्या प्रभाग क्रमांक 04 मध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात माजी नगरसेवक रश्मी देसाई यांनी माजी नगराध्यक्ष आणि साखळी पालिका क्षेत्रातले बडे प्रस्थ धर्मेश सगलानी यांचा अवघ्या 30 मतांनी पराभूत केले. आणि मुख्य म्हणजे जेथे भाजपने साखळी आणि फोंडा पालिकेच्या निवडणुकांसाठी जीवाचे रान केले तेथे कॉँग्रेस पक्षाची सावली देखील पासंगाला कुठे दिसली नाही. याचा परिणाम हा झाला की भाजपने साखळी आणि फोंडा पालिकेची दोन्ही कुरणं आपल्या ताब्यात घेतली तर कॉँग्रेस पक्ष त्या कुरणांची कवाडं देखील उघडण्यात पूर्णतः अपयशी ठरला.

साखळी पालिकेवर भाजपचा अश्वमेघ !
११ प्रभागांमध्ये भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी. | |
प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार |
प्रभाग १ | यशवंत माडकर |
प्रभाग २ | निकिता नामदेव नाईक |
प्रभाग ३ | सिद्धी संदेश पोरोब |
प्रभाग ४ | रश्मी दिलीप देसाई |
प्रभाग ६ | विनंती विनायक पार्सेकर |
प्रभाग ७ | ब्रह्मानंद रघुनाथ देसाई |
प्रभाग ८ | रियाज हमीद खान (बिनविरोधी) |
प्रभाग ९ | आनंद बाबनी काणेकर |
प्रभाग १० | दयानंद पुंडलिक बोर्येकर |
प्रभाग ११ | दीपा निलेश जल्मी |
प्रभाग १२ | अंजना अर्जुन कामत |
कॉँग्रेसचे एकमेव उमेदवार विजयी | |
प्रभाग 5 | प्रवीण ब्लेगन (बिनविरोध ) |
साखळी येथे सदानंद शेट तानावडे यांनी आपल्या खांद्यावर पालिकेची जवाबदारी पेलत भाजपला विजय मिळवून दिला. साखळीत कॉँग्रेसचे खंदे समर्थक असतानाही कॉँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने ग्राऊंड लेव्हलवर काहीच योगदान न दिल्याने त्यांस न भूतो न भविष्यती असे अपयश पहावे लागले. तर आता कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर या पराजयासाठी काय सबबी देतात हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. पण हे मात्र खरे की धर्मेश सगलांनी सारख्या खंदया कॉँग्रेसी कार्यकर्त्याची हार हे पचवणे अवघड होणार आहे. धर्मेश सगलांनी यांनी पुढे भविष्यात कॉँग्रेसी पक्षाच्या नाकर्तेपणास कंटाळून आणि आपल्या राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्याकरिता कॉँग्रेसला “जय श्री राम” केल्यास कुणी आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही. यासाठी कॉँग्रेसने गाढ झोपेतून उठण्याची नितांत गरज आहे.

फोंडा पालिकेत मगो-भाजपने शिजवले विजयाचे खतखते
साखळी पालिकेप्रमाणे फोंडा पालिकेत देखील भाजप आणि मगो पुरस्कृत पॅनलने आपल्या ताटात खतखत्याच्या फोडी वाढून घेतल्या. पर्यायाने त्या त्यांच्या ताटात कॉँग्रेसनेच अलगदरित्या वाढल्या असे आपल्याला एकंदरीत मागील तीन महिन्यांच्या काळात घडलेल्या घडामोडी पाहताना लक्षात येईल. रवी नाईकांनी आपली झाकली मूठ सव्वा लांखाचीच म्हणत, फोंडा पालिका आपल्या मुठीतच ठेवण्यात यश मिळवले. त्यांचे थोरले चिरंजीव आणि शेंडेफळ दोघांनी आपले प्रभाग जिंकून आणले.

भाजप , रायझिंग फोंडा आणि अपक्ष उमेदवार निवडून देत फोंडा पालिका भाजपच्याच पारड्यात गेली आहे. भाजपचे 10 , रायझिंग फोंडा 4 आणि अपक्ष 1 असे फोंडा पालिकेचे बलाबळ राहिले.
प्रभाग | विजयी उमेदवार |
प्रभाग 1 | रॉय नाईक |
प्रभाग 2 | विरेन्द्र ढवळीकर |
प्रभाग 3 | ज्योति नाईक |
प्रभाग 4 | व्यंकटेश नाईक |
प्रभाग 5 | रितेश नाईक |
प्रभाग 6 | शौनक बोरकर |
प्रभाग 7 | विश्वनाथ दळवी |
प्रभाग 8 | प्रतीक्षा नाईक |
प्रभाग 9 | रुपक देसाई |
प्रभाग 10 | दीपा कोलवणकर |
प्रभाग 11 | वेदिका वळवईकर |
प्रभाग 12 | शिवानंद सावंत |
प्रभाग 13 | विद्या पुनळेकर |
प्रभाग 14 | आनंद नाईक |
प्रभाग 15 | गीताली सिनाई तलावलीकर |
चला ! निवडणुकीचा धुरळा जसा आसमंती उडाला तसा तो जमिनीवर परत बसलाही, बाकी काहीही असो, आता विजयी उमेदवारांनी कामाला लागले पाहिजे. जनतेची ‘उदर्गत’ ही आपल्या स्वार्थापेक्षा जास्त गरजेची आहे हे प्रमाण मानून त्यांनी जनतेचे प्रश्न तडीस लावले पाहिजेत. कॉँग्रेस भाजपाने स्वपरीक्षण करून राजकारण करतानाच समाजकारणावर भर दिला पाहिजे. तरच कुठे तरी या स्वराज्य संस्थांवर सुराज्य नांदेल.