सरकारी कचेऱ्या की कोंडवाडा ?

विर्नोडा माजी सरपंच सीताराम परब यांचा सवाल

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : ग्रामीण नियोजन विभाग आणि सर्व्हे विभागाच्या कचेऱ्या म्हणजे कोंडवाडे बनलेत. या याकडं लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झाल्यानं या दोन्ही कचेऱ्या कदंबा बसस्थानकात स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी विर्नोडा माजी सरपंच सीताराम परब यांनी केलीय.

गोवा सरकारनं माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३३ कोटी रुपये खर्च करून तीस वर्षे रखडत पडलेलं बसस्थानकाचं काम करून थाटामाटात उद्घाटन सुद्धा केलं. चक्क दोनवेळा उद्घाटन करूनही बसस्थानक अजूनही खुलं झालंच नाही. त्यानंतर पुन्हा नवीन आमदार तथा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी ३ कोटी खर्च करून अर्धवट राहिलेलं काम करून उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या परीनं पुन्हा उद्घाटन केलं. हल्लीचं वाहतूक खातं जे गेली दहा-बारा वर्ष भाड्याच्या जागेत होतं ते बसस्थानकात आणुन वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुखाचा श्वास दिला. सरकार भाड्यापोटी खर्च करीत असलेली रक्कम परत आपल्या तिजोरीत वळवली.

जमीन मोजणी विभागाची वेगळीच कथा आहे. ते ज्या जागेतून काम करतात तिला सरकारी कचेरी म्हणणं धाडसाचं ठरावं. पंधरा चौरस मीटर जागेत 8 ते 9 जण काम करतात म्हणजे जणु कोंडवाडाच. अशात सामाजिक अंतर कुठुन ठेवणार? शिवाय रोज कामासाठी येणार्‍या लोकांचा विचार केला तर, समजा दिवसांत वीस अर्ज आले तर अर्जदार आणि त्यांचे वकील असे पाच लोक धरले तर किमान शंभर लोकांचा जमाव असतो. पंधरा चौरस मीटरमध्ये इतके कर्मचारी आणि त्यांची अत्याधुनिक साधनं यातुन न बसता काम करावं लागतं. तक्रार कोणाकडे करणार आणि केली तरी फायदा काय?

आपले पेडण्याचे लोकप्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री आपण पेडणेकरांचा सेवक असल्याचा उल्लेख वारंवार करतात, पण सेवेच्या बाबतीत दुर्लक्ष करतात, असं लोकांना वाटू लागलय. त्यांच्याबरोबर असलेले लोक सुद्धा त्यांच्या लक्षात या गोष्टी आणत नाहीत, याचं नवल वाटतं. असं करून ते एक प्रकारे पेडणेकरांना गृहित धरतात, असा संशय घेण्यास वाव आहे. शिवाय एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येवून विकासाच्या गोंडस नावाखाली आपण रात्रीत पक्ष बदलुन वजनदार खाती आणि उपमुख्यमंत्र्यांसारखं पद मिळवलं तरी लोक आपल्यालाच निवडून देतात, अशी त्यांची पक्की खात्री झाली आहे किंवा करून दिली गेली आहे. भोळा भाबडा पेडणेकर विकासाच्या गाजरामागे आंधळेपणाने धावतो, याचा अनुभव ते घेत आहेत. दरम्यान, जमीन मोजणी आणि शहर विकास विभाग ताबडतोब नव्या जागेत जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. उपमुख्यमंत्री हे करण्यास असमर्थ असतील तर ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याच्या तयारीत पेडणेकर आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!