सरकारला महसुलापासून वंचित ठेऊन ९ तालुक्यांत चालते भाजप पुरस्कृत ‘टँकर माफियाचे’ राज्य – अमित पाटकरांचा घणाघाती आरोप

काँग्रेसने घेराव घालून जाब विचारल्यानंतर जलस्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांचे लोकांना पिण्यासाठी टँकरचे पाणी न वापरण्याचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी – भारतीय जनता पक्ष गोव्यातील नऊ तालुक्यांमध्ये सरकारला शून्य महसूल देऊन टँकर माफिया चालवत आहे. सरकारने ताबडतोब सेवानिवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमावा अशी आमची मागणी आहे. गोव्यातील पाण्याच्या टँकरच्या कारभाराची आणि या व्यवसायातील बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन देण्याऱ्या विविध सरकारी विभागांच्या भूमिकेची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनी करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

सांकवाळ येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जलसंपदा विभागाला दिल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना, पेडणे, बार्देज आणि तिसवाडी या तीन तालुक्यातील पाणी टँकरचालकांकडूनच शासनाला महसूल मिळतो, या दाव्याला पुष्टी देणारे कागदोपत्री पुरावे सादर केले.

गोव्यातील पाण्याचे टँकर चालवण्यावर जलसंपदा विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. लोभी टँकर चालकांकडून दिशानिर्देशांचे सर्रास उल्लंघन झाल्याने थेट जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

सांकवाळ येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या घटनेबाबत त्यांच्या विभागाच्या पूर्ण दुर्लक्षाबद्दल आम्ही धारेवर धरल्यानंतर जलसंपदा खात्याचे अभियंता प्रमोद बदामी यांना त्यांची चूक कबूल करुन, टँकरचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आवाहन गोमंतकीयांना करावे लागले हे धक्कादायक आहे, अमित पाटकर म्हणाले.

गोव्यातील लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढत आहोत. सरकारने आमचा आवाज दाबण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणे टाळावे. भाजप सरकारने उद्धटपणाचा वापर केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.

असंवेदनशील भाजप सरकार ऐन उन्हाळ्यात पाणी वाटपाच्या गैरव्यवस्थापनामुळे पूर्णपणे उघडे पडले आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे अॅड. श्रीनिवास खलप यांनी मत नोंदवले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, महिला काँग्रेस अध्यक्षा बीना नाईक, वीरेंद्र शिरोडकर, साव्हीयो डिसिल्वा, एव्हरसन वालिस, मुक्तमाला शिरोडकर, विजय भिके, मोरेनो रेबेलो, अॅड. जितेंद्र गावकर, सुदिन नाईक राजेंद्र कोरगावकर, संजय बर्डे, दिव्या कुमार व इतरांचा सहभाग होता.

तत्पूर्वी पोलिसांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला मुख्य अभियंत्यांना भेटण्यापासून रोखले, मात्र जोरदार वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना आत प्रवेश देण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!