सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे प्रयत्न अखेर फलद्रूप, सत्तरीच्या नाणुस किल्ल्यावर प्रतिवर्षी सरकारची क्रांतिवीर दिपाजी राणेंना आता कायमस्वरूपी मानवंदना

गोवा राज्याच्या इतिहासात एखाद्या क्रांतिवीराचा इतिहास समोर येण्यासाठी लढलेल्या चळवळीला अशा प्रकारे यश प्राप्त होणे ही पहिलीच घटना. आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे.

ऋषभ | प्रतिनिधी

२७ जानेवारी २०२३ : इतिहास, गोवा , प्रजासत्ताक दिवस, सत्तरी-नाणूस , क्रांतिवीर दीपाजी राणे, क्रांतिदिन

Nanuz Fort, Valpoi (Ruins) - Golden Goa
एकेकाळी पोर्तुगीजांंविरोधात उठलेल्या बंडाच्या मोहोळाचे केंद्रबिंदू ठरलेला हा क्रांतिवीर दीपाजी राणेंचा अभूतपूर्व नाणूसचा किल्ला, आता फक्त भग्न अवस्थेत उरला आहे. आता ही गौरवशाली इतिहासाची सोनेरी पाने येणाऱ्या पिढीकरिता राखून ठेवण्याची जवाबदारी सत्तरी इतिहास संवर्धन समिती व त्या अनुषंगाने गोवा सरकारची आहे.

वाळपई : सत्तरी इतिहास संवर्धन समिती गेल्या १४ वर्षांपासुन नाणुस किल्ला चळवळीत भाग घेऊन ह्या किल्याच्या संवर्धनासाठी आणि क्रांतिवीर दिपाजी राणे यांचा इतिहास नवीन पिढी समोर यावा म्हणून लढत आहे. ह्या चळवळीला मोठे यश प्राप्त झाले असुन दरवर्षी २६ जानेवारीला सत्तरीतील ऐतिहासिक नाणुस किल्ल्यावर होणाऱ्या क्रांतीदिन कार्यक्रमात क्रांतिवीर दिपाजी राणेंना सरकारी मानवंदना देण्यात येईल अशी ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, यांनी सत्तरी तालुक्यातील एेतिहासिक नाणुस किल्ल्यावर गोवा राज्याच्या स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवानिमित्त क्रांतिवीर दिपाजी राणेंना मानवंदना देण्यासाठी सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.


या कार्यक्रमात सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे सन्मवयक अॅड. शिवाजी देसाई, क्रांतीवीर दिपाजी राणे यांचे पणतु दिपाजी राणे, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, आयए एस अधिकारी संजित रोड्रिक्स, उपजिल्हाधिकारी प्रविण परब, संयुक्त मामलेदार अपुर्वा कर्पे, गटविकास अधिकारी सुर्याजीराव राणे, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, वाळपई नगराध्यक्ष शेहजीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, रामदास शिरोडकर, प्रसन्ना गावस, शराफत खान, इद्रुस शेख तसेच इतर नगरसेवक, भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे, वासुदेव परब तसेच इतर पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य, , पोलिस खात्याचे अधिकारी तसेच इतर खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.


मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत पुढे बोलताना म्हणाले, नाणुस किल्ल्याचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प सरकारने हातात घेतला आहे. सरकारचे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच पुरातत्व खाते या करीता कामाला लागले आहे. जर नाणुस किल्याच्या संवर्धनासाठी जमीन संपादन करण्यासाठी किल्याच्या बाजूकडील जमीन किंवा दान पत्र करून मिळेल तर ह्या ऐतिहासिक कील्यास सरकार गतवैभव प्राप्त करून देऊन जसा पुरातन काळात किल्ला होता अगदी त्याच पद्धतीने बांधून देईल. नाणूस किल्याची चळवळ सातत्याने पुढे नेण्यासाठी आणि सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अँड शिवाजी देसाई आणि त्यांची संपूर्ण टीम कौतुकास पात्र आहे. सत्तरी तालुक्यातील सर्व लोकांनी ह्या किल्याच्या संवर्धनासाठी पुढे यायला पाहिजे. क्रांतिवीर दिपाजी राणेंचा इतिहास सर्वांसमोर यायला पाहिजे. आणि त्याची जाणिव प्रत्येकांने ठेवली पाहिजे असे मुख्यंमंत्री शेवटी म्हणाले.

Photo


यावेळी बोलताना सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अॅड. शिवाजी देसाई म्हणाले, की इतिहास विसरणारी जी माणसे असतात त्यांचा इतिहास पण बिघडलेला असतो आणि भूगोल पण बिघडतो. सत्तरी तालुक्याचा इतिहास तेजोमय आहे. व त्यात प्रचंड मोठे सामर्थ आहे. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत हे जेव्हा आमदार होते. तेव्हा क्रांतिवीर दिपाजी राणेंचे नाव वाळपई सरकारी इपितळाला द्यावे म्हणून त्यांनी सर्व प्रथम गोवा विधानसभेत ठराव मांडला होता. नाणूस किल्ला चळवळीसाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. २६ जानेवारी हा दिवस वास्तविक गोवा स्वराज्य क्रांतीदिवस म्हणून गोवा सरकारने घोषित करायला पाहिजे. आणि सर्व सरकारी स्तरावरती हा दिवस क्रांतीविर दिपाजी राणेंच्या नावाने क्रांती दिन म्हणून साजरा केला पाहिजे. नाणूस कील्यासाठी लढाई आम्ही या पुढे देखील सुरूच ठेऊ. कायक्रमाच्या सुरुवातीला अॅड. शिवाजी देसाई यांनी क्रांतीवीर दिपाजी राणे व दादा राणे यांच्यावरील एेतिहासिक पोवाडा मुख्यमंत्र्यासमोर सादर केला.

Photo


सुरुवातीला मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक जसपाल सिंह, आय एएयस अधिकारी संजित रॉड्रिग्ज यांनी नाणूस किल्ल्यावर पुष्पचक्र वाहून क्रांतिवीर दिपाजी राणेंना मानवंदना दिली तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दीपप्रज्वलन केले व क्रांतीवीर दिपाजी राणेंच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण केला. वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि पोलिसानी सरकारी नियमानुसार घोषा सहित क्रांतिवीर दिपाजी राणेंना मानवंदना दिली. हा सत्तरीसाठी ऐतिहासिक क्षण होता. नाणुस किल्ल्यावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या वाटेवरून चालत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत नाणुस किल्ल्यापर्यंत आले. यावेळी अनेकांनी त्यांच्यासोबत स्वतःचे फोटो काढले.

Photo

मुख्यमंत्र्यांनी नाणुस किल्ल्याची पाहणी केली. तसेच नाणुस किल्ल्याच्या शेजारी असलेल्या म्हादई नदीच्या बाजुला जाऊन म्हादई नदीचे दर्शन घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोवा सरकारच्या मुख्य सचिवालयाचे कार्यालय, गृहखाते, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कार्यालय, पोलिस खाते आणि सत्तरी इतिहास संवर्धन समिती, किल्याच्या बाजूकडील जमीन मालक पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरित्या संपन्न झाला. नाणुस किल्ल्यावर जवळपास एक हजार लोकांची उपस्थिती होती. तत्पुर्वी कार्यक्रम सुरु होण्याअगोदर अॅड शिवाजी देसाई यांनी नाणुस किल्ल्या व क्रांतीवीर दिपाजी राणे यांचा इतिहास याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती करुन दिली. सुरवातीच्या कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन विजय नाईक यांनी केले शेवटी दिपाजी राणे यांनी आभार मानले.

चौदा वर्षाच्या तपाचे फलित.


सूरवातीला नाणूस किल्ला अनेकांना माहीत नव्हता. दिवंगत पत्रकार भाई तेंडुलकर २६ जानेवारीला क्रांती दिन कार्यक्रम सत्तरी तालुक्यातील पत्रकारांना सोबत घेऊन करायचे.पण हा कार्यक्रम बंद पडला. सत्तरी इतिहास संवर्धन समितीने शिवधनुष्य हातात घेतले. सातत्याने मोठ्या प्रमाणात नाणूस किल्यावर प्रत्येक २६ जानेवारीला क्रांती दिन कार्यक्रम केला. सरकार दरबारी अनेक विनंत्या , अर्ज केले पण काहीही होत नव्हते. परंतु समितीने जिद्द सोडली नाही.अखेर पुरावे शोधून काढलेच आणि मुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने सत्तरी तालुक्याचा संपूर्ण इतिहास गोवा स्वातंत्र्य लढ्याच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात आणला.

नाणूसच्या किल्याच्या अस्तित्वात असलेल्या २ छायाचित्रां पैकी एक छायाचित्र
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!