….श्रीपाद नाईक या प्रश्नांची उत्तरं देतील काय ?

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजीः उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत पाच वेळा बहुमताने निवडून देऊन आलेले आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना कायम केंद्रीयमंत्रीपदी असलेले खासदार श्रीपाद नाईक यांनी पेडणे तालुक्याची घोर निराशा केली आहे. त्यांच्या विजयात पेडणे तालुक्याचा नेहमीच मोठा वाटा राहीला आहे आणि एवढे करून त्यांनी या तालुक्याला वाऱ्यावर सोडल्याची खंत पेडणेचे माजी नगराध्यक्ष डॉ. वासुदेव देशप्रभू यांनी व्यक्त केली.

महामार्गाबाबत खासदारांचे मौन
अरबी समुद्र, तेरेखोल आणि शापोरा नदी अशा त्रिवेणी जलाशयाने वेढलेला हा भुभाग. या तालुक्यातील सीमावर्ती गांव पत्रादेवी स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख रणांगण होते. पत्रादेवी येथून महाखाजनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग नं 66 (पूर्वीचा नं.17) ह्या तालूक्याला अर्ध्याने विभागतो. हा रस्ता आता चार पदरी झाला आहे. हे एक छान काम केंद्र सरकारचं आहे.

दुर्दैवाने हा महामार्ग अपघात आणि मृत्युचा सापळा झाला आहे. याला प्रामुख्याने भ्रष्टाचार कारणीभूत आहे. एका माजी स्थानिक आमदारांना लाचेपोटी कंत्राटदाराने दोन दोन अलिशान गाड्या बहाल केल्याचा उघड आरोप होत आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असूनही श्रीपाद नाईक यांना पेडणेवासियांना भोगाव्या लागणाऱ्या या संकटाचे अजिबात पडून गेले नाही की काय,अशीच परिस्थिती आहे. श्री. नाईक हे ह्या आरोपांची कधी शहानिशा करतील, या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश ते आपल्या सरकारला देतील काय, असा सवाल डॉ. देशप्रभू यांनी केलाय.
पेडणे रेल्वेस्थानक दुर्लक्षीत
कोकण रेल्वे सुध्दा पेडणे तालुक्याला विभागते. गेली पंचविस वर्षे पेडणे स्थानकाचा दर्जा वाढविण्यात आला नाही. पेडणे स्थानकासाठी संगणक आरक्षण उपलब्ध नाही. अनेक गाड्या इथे थांबतच नाहीत. याबाबत खासदारांकडे अनेक निवेदने, आर्जव, विनंत्या करून झाल्या तरीही त्यांच्याकडे हा विषय सोडवता आलेला नाही. याबाबत खासदार नाईक काय म्हणतील, असाही प्रश्न डॉ. देशप्रभू यांनी केला.

क्रीडानगरी आणि इनडोअर स्टेडीयमचा फज्जा
ह्या वर्षी 2023 मध्ये 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होऊ घातल्यात. गोव्यासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरावी. 1999 साली दहा लक्ष चौरस मीटरपेक्षा अधिक जागा क्रीडानगरीसाठी बळकावली. या जागेवर अजूनपर्यंत राष्ट्रीय स्पर्धांसाठी एकही पायाभूत सुविधा उभारलेली नाही. क्रीडानगरीच्या जागेत आयुष इस्पितळ उभारण्यात आलं.

क्रीडानगरीच्या नावानं येथील शेतकऱ्यांची थट्टा झालीए. क्रीडा स्पर्धांसाठी म्हणून पेडणेत उभारलेल्या इनडोअर स्टेडीयममध्ये सध्या सीआयएसएफ बटालीयनची सोय करण्यात आली आहे. या स्टेडीयममध्ये क्रीडा स्पर्धा होतील की पेडणेकरांना चुना लावण्यासाठीच हे स्टेडीयम उभारले होते, याचा उलगडा होणे गरजेचे आहे. आपले खासदार महोदय या गोष्टीत लक्ष घालणार आहेत की नाही, असा टोलाही डॉ. देशप्रभू यांनी लगावला.
पाण्यासाठी वणवण
1992 साली पेडणे तालुक्याची लोकसंख्या पन्नास हजार होती. त्यावेळी चांदेलचा पाणी प्रकल्प कार्यान्वीत झाला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यात एका थेंबाचीही वाढ झाली नाही. आता लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष आहे.

या प्रश्नाकडे नाईक यांनी कधी लक्ष दिलंय काय की हे त्यांच्या अखत्यारित येत नाही असं त्यांना वाटतं, असा प्रश्न डॉ. देशप्रभू यांनी केला. तुये गावांत इलेक्ट्रॉनिक मॅनिफॅक्चरींग क्लस्टरचे भूमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झालं होतं. त्या प्रकल्पाचं काय झालं याचं काहीच सोयरसूतक नाईक यांना लागत नाही काय. तुये औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराचा विचार करताना कच्चा माल घेऊन येणारे मोठे कन्टेनर कुठून येणार याचे नियोजन कुठे चुकले,असाही टोला डॉ. देशप्रभू यांनी लगावला आहे.

कुठे आहेत 80 टक्के नोकऱ्या ?
आयूष इस्पितळाच्या उदघाटनावेळी तिथे 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी राखीव असणार आणि तसा करार केल्याचे खासदार नाईक यांनी घोषित केले होते. हा करार कुठे आहे आणि त्याचे पालन का होत नाही, असा सवाल डॉ. देशप्रभू यांनी केला. सुमारे सहाशे कोटी रुपये खर्चून अखिल भारतीय आयुर्वेद संस्था त्यांनी धारगळला भेट दिली. या इस्पितळाची नोकर भरती स्थानिक पातळीवरून न होता थेट दिल्लीतून होते मग दिल्लीत नाईक यांना पेडणेकरांची आठवण कशी काय होत नाही, असा सवाल डॉ. देशप्रभू यांनी केला.

इब्रामपूर खरोखरच आदर्श बनला काय ?
पेडणे तालुक्यातील इब्रामपूर गांवची आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीयमंत्री नाईक यांनी निवड केली. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असूनही हा गांव आदर्श का बनला नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं. खरं म्हणजे इब्रामपूर गांव आदर्श बनवून देशासमोर आदर्श निर्माण करायला हवा होता. खासदार नाईक हे याबाबत आपले अपयश स्वीकारतील काय,असा सवालही डॉ. देशप्रभू यांनी केला.

किती विचारू प्रश्न
पद्व्युत्तर वैद्यकीय शिक्षणात ओबीसींना राखीवता मिळवण्यासाठी तेवीस वर्षे लागली. याचे श्रेय श्री. नाईक यांना द्यायचे की मधु नाईक यांना द्यायचे, असा खोचक सवाल डॉ. देशप्रभू यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मातृभाषेला प्रोत्साहन देण्याची भाषा करतात तर इथे पेडण्यातील बहुसंख्य सरकारी मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत, त्याचं नाईक यांना काहीच पडून गेलं नाही काय, मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल, कॅसिनो सिटी, थीम पार्क, सि. आय.एस.एफ बटालीयन यांच्या सारखे प्रकल्प तालुक्यात उभारले जाताहेत.

ह्या सर्व प्रकल्पांत गोव्याबाहेरील लोक कामास रुजू होतील. त्यांच्या मुलाबाळांसाठी योग्य शिक्षण व्यवस्था होणार आहे का? तसेच कचरा विल्हेवाट व सांडपाणी समस्या यावर आपण लक्ष देणार आहत का ? ह्या प्रकल्पांसाठी पेडण्यातील शेकडो एकर जमिन गोव्याबाहेरील बांधकाम व्यवसायीकांच्या घशात ओतली जात आहे. पेडणेकर भूमीहीन होऊन बेघरही होतील अशीच एकंदर परिस्थीती आहे. श्रीपाद नाईक यांची या एकूण प्रकरणी काहीच जबाबदारी ठरत नाही काय, असा मोठा सवाल डॉ. देशप्रभू यांनी केला.

कोण देणार न्याय ?
मोपा विमानतळाच्या 70 टक्के भूपीडितांना अद्याप भरपाई मिळाली नाही. नोकरी, व्यवसायसंधीच स्थानिकांना डावलले जात आहे, टॅक्सीच्या विषयावरून पेडणेत स्थानिकांची फसवणूक सुरू असताना खासदार नाईक यांना मध्यस्ती करून हा विषय सोडविण्याची अजिबात इच्छा वाटली नाही. या सगळ्या गोष्टींबाबत खासदार नाईक आता या निवडणूकीत प्रचारावेळी काय उत्तर देणार, असा सवाल डॉ. देशप्रभू यांनी केला.

पेडणेतील अनेक गावांत सार्वजनिक स्मशानभूमीची कमी आहे, त्याबाबत नाईक यांनी पुढाकार का घेतला नाही. पेडणे विधानसभा मतदारसंघ गेली त्रेचाळीस वर्षे राखीव ठेवण्यात आलाय. जाणीवपूर्वक ही राखीवता कायम ठेवण्याचा घाट घातला जातोय, याबाबत श्रीपाद नाईक पेडणेकरांना न्याय देऊ शकतील काय, या असंख्य प्रश्नांची उत्तरे या निवडणूकीत त्यांना द्यावी लागणार आहेत, असेही डॉ. देशप्रभू म्हणाले.