लोगोस युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल तर्फे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचा मानद डॉक्टरेट देऊन गौरव करण्यात आला

Goan Varta Live | प्रतिनिधी
लोगोस युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल, यूएसए यांच्या तर्फे गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांना मानद डॉक्टरेट (Honoris Causa PH.d )देऊन गौरवण्यात आले . राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांना त्यांच्या विधी विज्ञान, साहित्य आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील अपवादात्मक कामगिरीबद्दल भूषवण्यात आले.
सदर सत्कार समारंभ जूने राजभवन येथे पद्मश्री परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी, परमपूज्य कार्डिनल फिलिप नेरी फेर्राव, गोवा आणि दमणच्या आर्कडीओसचे आर्चबिशप, फादर फ्रॅलेक्स चेलांगडी, गुडनेस टीव्हीचे संचालक डॉ. कुमार शर्मा, लोगोस विद्यापीठ आणि डॉ. अनिल मॅथ्यू, पीपल लीगल वेल्फेअर फोरम आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
अध्यात्मावर बोलताना राज्यपाल श्री पी.एस.श्रीधरन पिल्लई म्हणाले की, आमचे अध्यात्म कोणत्याही पंथ आणि त्याच्याशी निगडीत कुणा एका दृष्टिकोणापुरतेच मर्यादित नाही तर ते सर्व धर्मांचे सामूहिक योगदान आहे, भारत हा एकमेव देश आहे ज्यामध्ये विविध धर्म सलोख्याने आणि एकोप्याने नांदतात. पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले की, सार्वजनिक कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे कारण ते सर्वोच्च आहेत आणि आणि त्यांनी भल्यासाठी काम करावे असे आवाहन केले.
लोगोस युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल, यूएसए द्वारे प्रतिष्ठित मानद डॉक्टरेटने (Honoris Causa PH.d ) गौरवण्यात आल्याबद्दल राज्यपालांनी कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे लोकांच्या कल्याणासाठी अधिक काम करण्यास चालना मिळेल, असेही राज्यपाल म्हणाले.
पद्मश्री परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी आणि गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्राव यांचीही यावेळी भाषणे झाली. तत्पूर्वी, श्री एम.आर.एम. राव, आयएएस, राज्यपालांचे सचिव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्री पराग शहा यांनी आभार मानले. यावेळी फर्स्ट लेडी श्रीमती रीथा पिल्लई देखील उपस्थित होत्या.