रमाकांत पायाजी निराधार नाहीत…

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजी- गोव्यातील मुळ कोरगांव- पेडणेचे आणि सध्या मानसवाडा- मुळगांव येथे वास्तव्यास असलेले नामवंत नाट्यलेखक रमाकांत पायाजी यांच्या एकाकी आणि असहाय्य जगण्यासंबंधीचे वृत्त गोवन वार्ता लाईव्हने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरातील नाट्यप्रेमी, कलाकारांनी बरीच हळहळ व्यक्त केली होती. त्यांना मदत करण्यासंबंधीच्या हालचालींनाही वेग प्राप्त झाला होता. हे वृत्त सगळीकडे पसरताच त्यांच्या तीन मुली आणि जावई यांची मात्र बरीच अडचण झाली. आपल्या वडिलांकडे या मुली आणि जावयांनी खरोखरच दुर्लक्ष केलंय का किंवा ते त्यांची काळजी घेत नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित झाला.

शेवटी त्यांच्या मुली आणि जावयांनी गोवन वार्ता लाईव्हची भेट घेऊन या एकूणच प्रकरणामागील सत्यासत्यता उघडकीस आणली. हा निव्वळ विषय वृद्धपणीच्या हट्टीपणाचा आहे. सगळं करूनही आपल्या स्वभावात एखादी व्यक्ती बदल करू इच्छित नसेल किंवा आपल्या मर्जीप्रमाणेच वागणार असेल तर कुणी नेमकं करावं तरी काय, असा सवाल त्यांनी केला. आपल्या वडिलांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यांची समजूत काढून हा दूरावा कुणी कमी करत असेल तर त्यांचे स्वागत करू,असेही त्यांनी म्हटले आहे.
पगारदारी केअर टेकर कार्यरत
एका अधिकृत होम नर्सिंग संस्थेतून एक कायमस्वरूपी पगारधारी केअर टेकर त्यांच्या सेवेसाठी कार्यरत ठेवण्यात आला आहे. हा केअर टेकर त्यांची सगळी काळजी घेतो. काही स्वभावदोषांमुळे आत्तापर्यंत अनेकजण काम सोडून गेले. या विषयी सविस्तर बोलणे उचित ठरणार नाही. त्यांना खाण्या जेणवणाकडे काहीच कमी नाही. ते बिनधास्तपणे आपल्या मुलींकडे राहू शकतात पण त्यांनाच ती इच्छा नाही तर करणार काय,असा सवाल त्यांनी केला. ते मुळगांव इथे राहत असलेले घर हे त्यांच्या जावयांनीच त्यांना दिले आहे. या घराचे पाणी, वीज बिल जावयाकडून भरले जाते. या व्यतिरीक्त महिन्याचे सगळे सामान केअर टेकरकडे दिले जाते. औषध पाण्याचा खर्चही केला जातो. आपल्या मर्जीप्रमाणेच आपल्याला राहायला हवं, असा हट्ट धरूनच एखादी व्यक्ती वागत असेल तर त्यांचा हट्ट किती थरापर्यंत आणि किती तडजोड करून पूर्ण करावा,असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. जगासमोर आपण असहाय्य आहे आणि आपल्याकडे कुणीच लक्ष देत नाही अशी भूमिका घेऊन आपल्या मुली आणि जावयांची अप्रतिष्ठा करण्याचा जर त्यांनी संकल्प केला आहे, तर मग त्याला काय करणार, असा सवाल त्यांनी केला.
कुणीही पुढाकार घ्यावा, आम्ही तयार आहोत
रमाकांत पायाजी आणि त्यांच्या मुली आणि जावई यांच्यात समझौता घडवून आणण्यासाठी कुणीही पुढाकार घेतल्यास त्यासाठीच्या चर्चेला आम्ही तयार आहोत,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. वृद्धापकाळाचे जगणं हे सुखी, समाधानाचं व्हावं अशी सर्वांचीच इच्छा असते. आम्हालाही आमचे वडिल या परिस्थिती जगावेत अशी इच्छा नाही पण ते जर अजिबातच समजून घेत नसतील किंवा कुणाचंच एकून घेत नसतील तर शेवटी करावं काय,असाही सवाल त्यांनी केला. कुणीही पुढाकार घेऊन त्यांचे मनपरिवर्तन केले तर त्यासाठी चर्चेची आमचीही तयारी आहे, असा प्रतिसाद त्यांच्या कुटुंबियांनी दिला आहे.
हौशी रंगभूमीचा दादा
राज्यात एकही हौशी रंगभूमी नसेल ज्यांनी रमाकांत पायाजी यांचं नाटक केलं नसेल. आत्तापर्यंत त्यांची 55 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. राज्यस्तरीय राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना 1999-2000 मध्ये प्राप्त झालेला आहे. तत्पूर्वी त्यांना राजभाषा खात्याचा बा. द. सातोस्कर भाषा पुरस्कार 2016 मध्ये प्राप्त झाला आहे. या व्यतिरीक्त अनेक मान सन्मान त्यांना प्राप्त झाले.

कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडेंकडून दखल
राज्य कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणी दखल घेतली आहे. आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना पाठवून त्यांची नेमकी परिस्थिती काय आणि नेमका काय विषय झाला आहे, याची माहिती जाणून घेतील आणि तदनंतर तोडगा काढला जाईल, असंही ते म्हणाले.