मेरशी सर्कलवरील ई-चलन अजून बंद

Goan Varta Live | प्रतिनिधी
प्रतिनिधी | ज्ञानेश्वर वरक
पणजी – मेरशी सर्कलवरील आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ई-चलन देण्यास अजूनही सुरुवात झालेली नाही. चलन कोण देणार आणि त्यासाठी लागणारा खर्च कोण उचलणार हे अजून निश्चित झालेले नाही त्यामुळे ई-चलन कार्यवाही रखडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट मोबाईलवर ई-चलन देण्याच्या प्रणालीला २ जून पासून राजधानी पणजीत सुरुवात करण्यात आली आहे. एकूण १३ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना कॅमेऱ्यात कैद झालेल्यांना थेट मोबाईलवर ई-चलन पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पण मेरशी सर्कलवरील कॅमेऱ्यात कैद झालेल्यांना अजून चलन पाठण्यास सुरूवात झाली नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीची सुरवात झाल्यानंतर गृह खात्याकडून फाईल वाहतूक खात्याला येणार होती. त्यानंतर वाहतूक खाते ई-चलन देण्यास सुरवात करणार होते. त्यातून येणाऱ्या महसुलाची वाटणी 70 आणि 30 अशी खाजगी कंपनी आणि सरकारमध्ये होणार होती. मात्र ही फाईल गृह खात्याकडे पडून आहे. एक ई-चलन पाठण्यासाठी सरासरी २० रूपयांचा खर्च येणार असल्याची माहिती वाहतूक खात्यातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने गोवान वार्ता लाईव्हशी बोलताना दिली. हा खर्च खाजगी कंपनी संभाळणार की सरकार ते अजून निश्चित झाले नाही त्यामुळे ही फाईल गृह खात्याकडे पडून आहे. गृह खात्याकडून वाहतूक खात्याला आदेश येण्यापुर्वी कुणालाही चलन दिलं जाणार नसल्याची माहिती या अधिकाऱ्याने यावेळी दिली. आल्तिनो येथील आयटी हबमध्ये असलेल्या या कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली असता तिथे अधिक माहीती देण्यासाठी कोण अधिकारी मिळालेले नाहीत.

इतर बारा ठिकाणी कॅमेऱ्यात कैद होणाऱ्या वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांना ई-चलन पाठण्यात आली आहेत. आणि यातून एकूण दहा लाख रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. मेरशी सर्कल वरील आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली एका खाजगी कंपनीकडून बसण्यात आली आहे. पीपीपी तत्वावर या प्रणालीला सुरवात केली जाणार असल्याची घोषणा उद्धाटन कार्यक्रमावेळी मुखमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. वसूल करण्यात आलेल्या दंडातील 70 टक्के रक्कम कंपनीला आणि 30 टक्के रक्कम सरकारला असा करार केला असल्याचे मुख्यमंत्री सावंत त्यावेळी म्हाणाले होते. त्यानंतर ३१ मे पासून ही प्रणाली कार्यान्वीत झाली आहे. इतर बारा ठिकाणावरील ई-चलनही पाठवण्यास सुरूवात झाली, पण मेरशी सर्कल मात्र अधांतरी आहे. मेरशी सर्कलवरील आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही पीपीपी तत्वावर सुरू करण्यात आली आहे. एका खाजगी कंपनीने जवळपास 40 लाख रूपये खर्च करून हे कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे कंपनीलाही फायदा मिळावा म्हाणून 70 आणि 30 अशी वाटणी वसूल झालेल्या दंडाची होणार आहे.
