मुशाफिरी| तांबडी सुर्ला धबधब्यापर्यंत ‘जीटीडीसीची’ ट्रेकिंग मोहीम

ट्रेकिंगवेळी काही झरे व धबधबे टेकड्यांवरून वाहताना दिसतील. ताजी हवा, ताजे पाणी, रंगीबेरंगी पक्षी आणि फुलपाखरे तुम्हाला या ठिकाणाच्या नक्कीच प्रेमात पाडतील.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट, 29 जून | पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) द्वारे मान्सून ट्रेकिंग मोहीम रविवार, दि. २ जुलै रोजी तांबडी सुर्ला येथे आयोजित केली जाईल. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात असलेल्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध धबधब्यांपैकी तांबडी सुर्ला धबधबा आहे.

या मोहिमेत एकाच खडकात कोरलेल्या तांबडी सुर्ला येथील प्रसिद्ध शिवमंदिराला भेट देण्याचाही समावेश असेल. मंदिरापासून तांबडी सुर्ला धबधब्यापर्यंतची पायवाट समृद्ध आहे. धबधब्यांवर, ५० मीटर उंचीवरून झिगझॅग पद्धतीने वाहणाऱ्या आणि खरोखरच सुंदर दिसणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्याची संधी याद्वारे प्राप्त होईल. धबधब्यामुळे एक छोटासा तलाव तयार झाला आहे. येथे आपण थंड, स्वच्छ पाण्याचा आनंद घेऊ शकतात.

ट्रेकिंगवेळी काही झरे व धबधबे टेकड्यांवरून वाहताना दिसतील. ताजी हवा, ताजे पाणी, रंगीबेरंगी पक्षी आणि फुलपाखरे तुम्हाला या ठिकाणाच्या नक्कीच प्रेमात पाडतील. सुरुवातीला ट्रेकिंगची वाट बरीच रुंद असली तरी हळूहळू अरुंद होत जाते. चित्तथरारक दृश्य आणि शिव धबधबे तुमच्या साहसी आणि कंटाळवाण्या ट्रेकला योग्य आणि फलदायी बनवतील.

मंदिरापासून तांबडी सुर्ला धबधबा ९० मिनिटांच्या अंतरावर आहे. चढाईवर अवलंबून ट्रेकला ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. हा ट्रेक करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण यावेळी मिळणार आहे.

प्रति व्यक्ती शुल्क रु. १२००/- आकारण्यात येणार असून यात दुपारचे जेवण, वाहतूक आणि मार्गदर्शक यांचा समावेश आहे. म्हापसा रेसिडेन्सी येथून सकाळी ७.१५ वाजता पथक सुटेल. इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपडे, रेनवेअर, ट्रेकिंग शूज, स्नॅक्स आणि दुर्बीण ठेवावे. धूम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही. अधिक माहिती व नोंदणीसाठी  अनिल दलाल (जीटीडीसी) ९४२२०५७७०४ किंवा ८३७९०२२२१५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी https://goa-tourism.com/ संपर्क साधावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!