मुख्यमंत्र्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व निरिक्षकांबरोबर व्हर्च्युअल बैठक

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

पणजी- मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी डीजीपी, डीआयजीपी, सीएस, डीव्हायएस्पी, एस्पी आणि राज्यातीस सर्व पोलीस निरिक्षकांसोबत व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यानी कलम १४४, नाईट कर्फ्यू त्याचप्रमाणे कोविडच्या इतर निर्बंध मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले. महाराष्ट्र आणि कर्नाटक जरी लॉकडाऊन असला तरी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

लग्न समारंभ हा फक्त ५० लोकांपुरताच मर्यादित ठेवला जाणार आहे. जर ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्यास त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि हॉलच्या मालकांना आर्थिक दंड दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर दिली. त्याचप्रमाणे देवस्थानांच्या धार्मिक उत्सवांवरही निर्बंध घालण्यात आलेत. या उत्सवांना ५० लोकांपेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. मुस्लिम बांधवांनी शक्यतो घरातूनच नमाज अदा करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

उद्योग व्यवसाय ५० टक्के क्षमतेने सुरु राहातील
राज्यातील उद्योग व्यवसाय हे ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याच आर्थिक गोष्टींवर बंदी असणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री संध्याकाळी राज्यातील सर्व उपजिल्हाधिकारी आणि मामलेदारांसोबत बैठक घेणार आहेत.

आठवडी बाजार सुरु राहाणार
राज्यातील वेगवेगळ्या शहरातील आठवडी बाजार सुरु राहाणार आहेत. परंतु या आठवडी बाजारांमध्ये ६ फुटांच्या अंतरावर व्यापाऱ्यांना बसण्याचं बंधन घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात एकाबाजूला कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असताना आणि मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही राज्यातील आठवडी बाजारांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरुच आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!