महत्वाकांक्षी “सनी बॅंकर ” चित्रपटाचे चित्रीकरण येत्या जानेवारीपासून अमेरिकेत सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी
मुंबई : तळकोकणातील सरमळे गावातील अत्यंत सामान्य कुटुंबातुन आलेले सिंधुदुर्गचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक नाटककार अनिल सरमळकर यांचे लेखन दिग्दर्शन असलेला ड्रीम प्रोजेक्ट ” सनी बॅंकर ” या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरूवात जानेवारी २०२४ मध्ये अमेरिकेतील प्रख्यात विद्यापीठ कॅंपस मधे होणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्मीती मुल्ये, कलाकार, तंत्रज्ञ
इत्यादी स्तरावर महत्वाकांक्षी असलेल्या या चित्रपटाची चर्चा गेले एक वर्ष माध्यमातून होत आहे.
दरम्यान निर्मिती पुर्व प्रक्रीया पुर्ण होत आल्या असुन दिग्गज कलावंतांचा भरणा असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण अमेरिकेतुन सुरुवात होवुन त्यानंतर काही चित्रीकरण आफ्रिकेत केले जाणार असुन उर्वरित सर्व चित्रीकरण भारतामधे होणार आहे असे या चित्रपटाची निर्मिती संस्था फिलिपाईन्स फिल्म प्रोडक्शन्स च्या वतीने सांगण्यात आले.
फॅन्टसी मॅजीक रिॲलिजम आणि ब्लॅक कॉमेडी च्या माध्यमातून उलगडली जाणारी ही कथा भारतातील समाज व्यवस्थेवर व शोषणावर भाष्य करते तसेच ती एक सामाजिक राजकीय फिल्म असुन त्यात रहस्यमयता आणि स्वप्नवत अशा गोस्टी उलगडत जातात. कथा पटकथा अनिल सरमळकर यांनी लिहिली असुन आपण या पटकथेवर गेली चार वर्षे काम केले आहे असे अनिल सरमळकर यांनी सांगितले व ते पुढे म्हणाले की ‘या फिल्म च्या प्रत्येक नियोजित फ्रेम साठी मी शेकडो स्केचेस काढले आहेत’
अती महत्वाकांक्षी व बिग बजेट असलेल्या या चित्रपटातसाठी कलाकार तंत्रज्ञ यांची निवड देश परदेशातून करण्यात आली आहे. मुख्य दिग्दर्शक म्हणुन अनिल सरमळकर यांना अनेक अनुभवी सहाय्यक दिग्दर्शक सहकार्य करणार असुन विवीध तंत्रज्ञ यांची तगडी टिम बांधण्यात येत आहे.
” ही कथा जेवढी अद्भुत आहे तितकाच यावरील चित्रपटही अद्भूत भव्य असेल असे मत अमेरिकेतील प्रख्यात ब्रॉडवे रंगभूमीवरील नामवंत अभिनेते चेरी बेन यांनी सांगितलें असुन ते महत्वाची भूमिका या चित्रपटात साकारणार आहेत.
भारतीय चित्रपट सृष्टीतील महानायक बिग बी यांची अत्यंत आकर्षण असणारी आणि रहस्यमय अशी भूमिका या चित्रपटाचा प्राण असुन त्यांनीच ही भूमिका साकारावी यासाठी निर्मिती संस्था आग्रही आहे.
देश परदेशातील दिग्गज अभिनेते अभिनेत्री तंत्रज्ञ दिग्दर्शक आणि साक्षात बिग बी यांच्याबरोबर इतकी मोठी फिल्म करायची संधी मिळते याचा आनंद तर आहेच मात्र मी थोडा नर्व्हसही आहे.मात्र असे काम करण्याची संधी वारंवार येत नाही त्यासाठी मी मनाची तयारी करीत आहे असे दिग्दर्शक अनिल सरमळकर यांनी सांगितले.

दरम्यान येत्या वर्षी सुरुवातीलाच जानेवारी मध्ये ‘ सनी बॅंकर ‘ चे चित्रीकरण अमेरिकेत सुरु होणार आहे. सामान्य कुटूंबातील असलेल्या आणि आधीच मराठी इंग्रजी लेखक नाटककार म्हणुन आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेल्या अनिल सरमळकर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची आणखी एक संधी मिळत आहे त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.