मणिपूर हिंसाचार मुद्दा | विरोधक उतरले हौदात; सभापतींनी ओढला निलंबनाचा आसूढ !

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 31 जुलै |गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातल्या 10 दिवशी, मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत 7 विरोधक आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला.
आमदार जीत आरोलकर बोलत असतानाच, सभागृहाच्या हौदात जात मणिपूरच्या विषयावरून गोंधळ घालत चर्चेची मागणी केली तसेच घोषणाबाजी देखील केली. ताकीद दिल्यानंतर देखील गोंधळ सुरूच राहिल्याने मार्शलद्वारे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर, क्रुझ सिल्वा, कार्लुस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता या विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं.

नेमकं घडलं काय ?
शून्यप्रहराच्यावेळी खासगी ठरावाच्या चर्चेस विरोधकांनी नकार दिला, तत्पूर्वी काले कपडे घालून मणिपूरच्या हिंसाचाराच्या निदेशार्थ घोषणाबाजी केली. आमदार संकल्प आमोणकर यांचे बोलणे संपल्यावर जेव्हा आमदार जीत आरोलकर बोलण्यास उभे राहिले तेव्हा विरोधकांनी जीत यांस घेराव घालत मणिपूरच्या गंभीर विषयावर साथ देण्याची विनवणी केली.
विजय सरदेसाई यांनी आरोलकर यांच्या माइकमध्ये ‘मणिपूर-मणिपूर’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मार्शलद्वारे 7 ही आमदारांना सभागृहाबाहेर नेण्यात आलं.

सत्ताधारी आमदारांनी कडक कारवाईची मागणी केली
सभापति रमेश तावडकर यांनी आज आणि उद्याकरीता 7 ही विरोधकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तत्पूर्वी सदर घटना ही चुकीची असून यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका सभापतींनी घेतली असता, मुख्यमंत्री सावंत यांनी यावर तत्काल कारवाई करण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला, शेवटी सभापतींनी कडक कारवाई करत विरोधकांवर निलंबनाचा आसुढ ओढला.