“भ्रष्ट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किमान दिव्यांगांना “मिशन कमिशन” मधून सोडावे” अमरनाथ पणजीकरांचा घणाघात

ऋषभ | प्रतिनिधी
पणजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गोव्याचे भ्रष्ट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजप सरकारच्या “मिशन कमिशन” मधून कमीत कमी दिव्यांगाना सोडण्याचा सल्ला द्यावा. पर्पल फेस्टची निविदा माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे २ जानेवारी २०२३ रोजी उघडण्यात येणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भाजपच्या घरच्या एजन्सीने आधीच काम सुरू केले आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

ईएसजी कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या कामाचा व्हिडिओ सिद्धेश देसाई नामक व्यक्तीच्या आवाजासह प्रसिद्ध करून, गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्यातर्फे आयोजित “पर्पल फेस्ट -२०२३ ” चे काम गैरमार्गाने चालू असल्याचा दावा करत अमरनाथ पणजीकर यांनी गोवा राज्य दिव्यांग आयोगाला सुमारे ६ ते ७ कोटीच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.
इफ्फीचे रुपांतर इंटरनॅशनल फ्रॉड फेस्टीवल मध्ये केल्यानंतर, गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई आता पर्पल फेस्ट गोवा २०२३ मधून माया कमवत आहेत. गोवा राज्य दिव्यांग आयोग या प्रकरणाची त्वरित दखल घेईल आणि कारवाई करेल अशी आशा मी बाळगतो. गोवा लोकायुक्त प्रमाणित भ्रष्ट भाजप सरकारचे हे कृत्य समाजाप्रती असलेली असंवेदनशीलता उघड करते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
ईएसजी कॉम्प्लेक्स, पणजी येथे ६ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘पर्पल फेस्ट’साठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी’ची नियुक्ती करण्यासाठी २७ डिसेंबर २०२२ रोजी माहिती आणि प्रसिद्धी विभागाकडून निविदा काढण्यात आली. सदर निवीदेत सोमवार २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बोली उघडली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. बोली उघडण्यापूर्वीच एखादी एजन्सी काम कसे सुरू करू शकते? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी विचारला आहे.
हेही वाचाः First Caper travels arrives Goa | किर्गिस्तानहून गोव्यात आले खास पाहुणे
मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी निविदा प्रक्रिया रद्द करावी, ईएसजी कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेले काम दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये ज्या सिद्धेश देसाईचा आवाज आहे तो बेकायदेशीरपणे आमदाराचे स्टिकर लावणाऱ्या जीए ०७ पी ७७७० गाडीचा मालक आहे का त्याची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच ईएसजी कॉम्प्लेक्समध्ये निवीदेची बोली उघडण्यापूर्वीच एजंसीला काम सुरू करण्याची परवानगी कोणी दिली हे मुख्य सचिवांनी स्पष्ट करावे असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.
भाजप सरकारचे मुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट हे माया कमविण्याचे साधन बनले आहे. भाजप सरकारने इव्हेंट करुन १८ मिनिटांच्या शपथविधी सोहळ्यात जवळपास ६ कोटी खर्च करून निधीचा गैरवापर केला, असे अमरनाथ पणजीकर यांनी निदर्शनास आणून दिले.
आम्ही मुख्य सचिवांना अधिकृतपणे पत्र लिहून राज्याच्या तिजोरीच्या लुटीची गंभीर दखल घेण्याचे आवाहन करू. त्यांनी कारवाई न केल्यास आम्ही इतर पर्यायही शोधू, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.