भाजप सरकार महागाई, कर लावून जनतेला लूटत आहे : कॉंग्रेस

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोवा प्रदेश महिला काँग्रेसने शुक्रवारी महागाईवरून भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले व नरेंद्र मोदी सरकार दर आणि कर वाढवून जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला.
महिला अध्यक्षा बीना नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले आणि सांगितले की, 2013 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने जीवनावश्यक वस्तू परवडणाऱ्या असतानाही महागाईचे मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी जरीना शेख, शॅलेट मिरांडा, बेर्था कार्दोज आणि अनुराधा नाईक उपस्थित होत्या.

“महागाईचा केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम सर्वांवर होतो. आपल्या देशातील 140 कोटी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता प्रधानमंत्री महागाईवर बोलत नाहीत, पण जनतेची लूट करण्यात व्यस्त आहेत, असे नाईक म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी महागाईवरून काँग्रेसवर निशाणा साधत होते.

“सध्या किंमत दुप्पट किंवा त्या पेक्षाही वाढल्या आहेत हे सांगण्याची गरज नाही. जेव्हा भाजप सरकार घाऊक किंमत निर्देशांकात घट झाल्याची बढाई मारते, तेव्हा ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्त किंमत का मोजावी लागते,” असा सवाल त्यांनी केला.

इंधन आणि एलपीजीच्या दरवाढीवरून मोदी सरकार जनतेची लूट करत असल्याचंही बीना नाईक म्हणाल्या. “भाजीपाला आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लोक कसे जगतील,” असा प्रश्न त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, भाजप सरकार महागाईवर जनतेला दिलासा देण्यात अपयशी ठरले आहे.
“टोमॅटो खूप महाग झाले आहेत. सरकार किमतींवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले हे अतिशय खेदजनक आहे,” असे नाईक म्हणाल्या.