भाजपचे ‘सूट बूट सरकार’ लोकांना दिलासा देण्यात अपयशी

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी, 10 जून : महागाई, खनिज व्यवसाय आणि इतर क्षेत्रात भाजपचे ‘सूट बूट सरकार’ लोकांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे आरोप करत, काँग्रेसने शनिवारी या संदर्भात लोकांनी त्यांना प्रश्न केले पाहिजे असे म्हटले. काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी शनिवारी म्हापसा येथे पत्रकार परिषद घेतली आणि आश्वासने न पाळल्याबद्दल भाजपवर टीका केली.
काँग्रेस नेते वीरेंद्र शिरोडकर, हिमांशू तिवरेकर, प्रदिप हरमलकर, अक्षय नाईक, प्रमेश मयेकर, प्रदिप हरमलकर व अतुल नाईक उपस्थित होते.

‘‘गोव्यातील जनतेला महागाईचा त्रास होत आहे. खनिज व्यवसाय बंद असल्याने अवलंबीत त्रस्त आहेत. तरीही सरकार या बाबत काहीच करत नाही. तसेच निवडणुकीच्या आदी तीन मोफत सिलिंडर देण्याचे आश्वासन भाजपने दिले होत, ते सुद्धा पाळले नाही. हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,’’ असे भिके म्हणाले.
कळंगुट आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे जमीन हडप करण्याचे प्रकार सुरू आहे. मात्र सरकार यावर मौन बाळगून आहे असेही ते म्हणाले.
‘आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्यांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही,’’ असे भिके यांनी निदर्शनास आणून दिले.
विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला, पण कारवाई झाली नाही, असे ते म्हणाले. “जमीन बळकावणार्यांशी सेटिंग करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती, असे दिसते, नाहीतर मग जमीन बळकावणार्यांवर कारवाई का होत नाही. यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असे भिके म्हणाले.
रीव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने काँग्रेसला विनाकारण लक्ष्य केल्याची टीकाही भिके यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लढवण्याबाबत रीव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भिके म्हणाले की, हा प्रादेशिक पक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी लोकसभा निवडणुक लढविण्यास इच्छूक झाला आहे.
“मनोज परब खनिज व्यवसायावर आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना कसे त्रास होत आहे यावर बोलत नाहीत. सत्तेत असलेल्या राजकारण्यांद्वारे चालवल्या जाणार्या बेनामी ट्रान्सपोर्ट कंपनीबद्दल बोलण्याबाबतही ते हिंमत दाखवत नाही,” असे ते म्हणाले.
“रीव्होल्युशनरी गोवन्स पक्ष फक्त नावापुरताच आहे आणि मतांचे विभाजन करण्यासाठी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. सर्वांनी त्यांचा पक्ष सोडला आहे,’’ असे भिके म्हणाले.
तसेच म्हादईच्या मुद्द्यावरून पदयात्रा का काढण्यात अयशस्वी ठरले हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे असे भिके म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत रीव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या नेत्यांचा फोटोही भिके यांनी दाखवला व या दोन्ही पक्षांचे संबंध स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले.

“परब यांनी गोव्यातील लोकांना स्थानिक व्यवसायात मदत करण्याचे आश्वासन दिले होते, त्यांनी किती लोकांना मदतीचा हात दिला आहे ते सांगावे,” असे भिके म्हणाले.
मनोज परब हे पक्षात एकमेव नेते राहिले असल्याने त्यांनी आता लोकसभेच्या दोन्ही जागा लढवाव्यात, असे त्यांनी सांगितले.