भाऊसाहेबांची 50वी पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी व्हावी; प्राचार्य वेलिंगकरांची सरकारकडे मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट : मुक्त गोमंतकाचे भाग्यविधाते,गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची ५० वी पुण्यतिथी येत्या १२ ऑगस्ट,२०२३ रोजी येत आहे. या निमित्ताने शासकीय पातळीवर ही पुण्यतिथी गोवा सरकारने साजरी करावी या माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी केलेल्या मागणीला प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी पाठिंबा दिला.
तसेच पुण्यतिथीचे निमित्त साधून स्व. भाऊसाहेबांच्या मीरामार येथील जुन्या झालेल्या समाधीला पूर्ण न्याय या सरकारने द्यावा या अनेक वर्षांपूर्वींच्या जुन्याच मागणीला उजाळा त्यांनी दिला.

स्व. भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण, विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठीच्या योजनेचे ठोस वेळापत्रक व योजनेचा तपशील येत्या पुण्यतिथीनिमित्ताने गोवा सरकारने जाहीर करताना,त्याच दिवशी या योजनेच्या कार्यवाहीचा शुभारंभ समाधीस्थानी करावा.
प्राचार्य वेलिंगकर नेहमीच आपल्या प्रखर धोरणं आणि सडेतोड विचारांसाठी ओळखले जातात. त्याच सडेतोड आणि प्रखर विचाराचा पारीपाक म्हणून त्यांनी या संदर्भात सरकारकडून झालेल्या काही त्रुटी पुन्हा एकदा लक्षात आणून दिलेल्या आहेत त्या अशा….
१ – दुर्दैवाने फक्त १२ मार्च व १२ ऑगस्ट या दोन तिथींच्या पूर्वी स्मारकाची कामचलाऊ साफसफाई सरकारचे संबंधित खाते करते. हेच २ दिवस समाधीस्थळ लोकांसाठी खुले असते,अन्यथा वर्षाचे बाराही महिने समाधीला कडीकुलुपात बंदिस्त करून ठेवले जाते. हे अत्यंत अपमानास्पद व निंदाजनक आहे.
२ – गेली कित्येक वर्षे या समाधीस्थानी छतातून होणारी पावसाची गळती सरकार थांबवू शकलेले नाही.
३ – ही समाधी कोणत्या थोर पुरुषाची आहे, तो कसा दिसत होता हे दर्शवणारी प्रतिमा व त्यांचा कार्य-महात्म्य-दर्शक फलक लावलेला नाही.
४ – सायंकाळ, रात्रीच्या वेळी समाधीस्थळ नीट प्रकाशमान दिसावे यासाठी समाधीस्थळात कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. शेजारच्या रस्त्यालगतच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात जेवढे दिसेल तेवढेच समाधीचे लोकांना दर्शन!
५ – शेजारीच लागून असलेल्या स्व.मनोहर पर्रिकरांच्या लखलखित, भव्य, विस्तारित, आधुनिक स्थापत्यकौशल्ययुक्त समाधीच्या झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर, स्व. भाऊसाहेबांच्या समाधीला एक दुर्लक्षित, दुय्यम, उपेक्षित असे स्वरूप आलेले आहे. ही स्थिती अपमानास्पद आहे! गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही सरकारने तिथे लक्ष पुरवलेले नाही.

मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत यांनी हल्लीच, स्व. भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण व सुशोभीकरण करणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्या घोषणेला मूर्त स्वरूप देण्याची , स्व. भाऊसाहेबांच्या ५० व्या पुण्यतिथीची संधी मुख्यमंत्र्यांनी साधावी आणि योजनेचा शुभारंभ त्या दिवशी करावा ही मागणी प्राचार्य वेलिंगकरांनी केली.

स्व. पर्रिकरांच्या कार्यकालात, कांपाल येथे असलेले “दयानंद बांदोडकर फुटबाॅल मैदान ” काढून टाकून तिथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. कांपालच्याच परिसरात मोकळ्या जागी आता गोवा सरकारने स्व. भाऊंच्या या खंडित मैदान-स्मारकाचे पुनरुत्थान करावे असे प्राचार्य वेलिंगकरांनी सुचवले आहे.

गोमंतकीयांच्या स्व. भाऊसाहेबांच्या प्रति असलेल्या आदराच्या भावनेतूनच केलेल्या उपरोक्त माफक मागण्यांची पूर्तता गोवा भाजपा सरकारने, स्व. भाऊसाहेबांच्या येत्या पुण्यतिथी निमित्ताने करावी, ही अपेक्षा.