बँक दरोडयाप्रकरणी अंग्रेज दासला खंडपीठाकडून जामीन

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसा : काणका येथील इंडियन ओव्हरसीज बँक शाखेवर पडलेल्या सशस्त्र धाडसी दरोडा प्रकरणातील संशयित अंग्रेज दास याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्थ जामिनावर सुटका केली आहे. गेली पाच वर्षे संशयित न्यायालयीन कोठडीत होता.
खंडपीठाने ३० हजार रूपये हमी रक्कम तसेच तितक्याच रकमेच्या दोघा हमीदारांची हमी म्हापसा अतिरीक्त जिल्हा न्यायालयात सादर करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाणे, संशयिताने कळंगुटमधील हंगामी पत्ता बदलल्यास तत्काळ चौकशी अधिकाऱ्यांना नवीन पत्ता सादर करणे, खंडपीठात सादर केलेल्या हमीपत्रानुसार प्रत्येक सोमवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी म्हापसा पोलीस स्थानकात हजेरी लावणे, याचे उल्लंघन झाल्यास त्यास त्वरित अटक करावी व पुन्हा जामीन अर्ज करता येणार नाही. तसेच संशयित आठवड्यातून चार दिवस हजेरी लावण्यास अपयशी ठरल्यास त्याला अटक करून पोलिसांनी जामीन रद्दचा अर्ज सादर करावा, अशा अटी खंडपीठाने हा जामीन अर्ज मंजूर करताना घातल्या आहेत.

या प्रकरणी हीरा शंकर दास, राजकुमार तुही दास उर्फ राजू दास, विजयकुमार मथ्रुर दास, अंग्रेज दास, ईश्वरी शोबीन दास, राजेश ग्रीधर दास या संशयितांना अटक केली होती. तर या टोळीतील सुनिल दास व विजय दास हे दोघे अद्यापही फरारी आहेत.
पोलिसांनी संशयितांविरूद्ध मार्च २०१८ मध्ये म्हापसा न्यायालयात ७१ साक्षीदारांच्या साक्षीसह ३११ पानी आरोपपत्र सादर केलेले आहेत.
दरोड्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जमावाने संशयित हिरा दास व विजयकुमार दास या दोघांना पकडून चोप दिला होता व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. बँकेच्या बाहेर जमावाने गराडा घातल्याने बँकेतील लुटीचे ११ लाख ८६ हजार रूपये संशयितांनी बँकेत टाकून पळ ठोकली होती. त्यानंतर पोलिसांनी या दरोडा प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राजकुमार उर्फ राजू दास व अंग्रेज दास या दोघांना अटक केली होती. हे दोघेही त्यावेळी फास्ट फुड चालवत होते. तर ईश्वरी दास व राजेश दास या दोघा संशयित आरोपींना बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.
दि.८ डिसेंबर २०१७ रोजी संध्याकाळी बँकेच्या शाखेवर दरोडा घातला होता. बँकेची एक महिला कर्मचारी व शेजारील एका व्यक्तीच्या सतर्कतेमुळे संशयितांचा हा दरोडा यशस्वी झाला नव्हता. पळ काढताना जमावाला पांगवण्यासाठी संशयितांनी बँकेच्या बाहेर गोळीबारही केला होता.