पर्वरीत हातमाग प्रशिक्षण वर्ग सुरु. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा पुढाकार

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवे पाऊल.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पर्वरी, दि. २५ जून (प्रतिनिधी-वार्ताहर) पर्वरी मतदारसंघात आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने नवे पाऊल टाकले आहे. पर्वरीतील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा यासाठी त्यांनी हातमाग प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत.

राज्य सरकारच्या हस्तकला विकास महामंडळाच्या सहकार्याने या प्रशिक्षण वर्गांची घोषणा करताच पर्वरीतील सुमारे शंभरेक युवती व महिलांनी नावनोंदणी करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काल पर्वरीतील विज्ञान पार्कच्या सभागृहात मंत्री खंवटे यांनी या वर्गांची एका छोटेखानी समारंभात पारंपरिक समई प्रज्वलन करून सुरूवात केली.

यावेळी हस्तकला विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद बुगडे, सरपंच स्पप्नील चोडणकर, सरपंच सोनिया पेडणेकर, जि. पं. सदस्य कविता नाईक, स्वयंसेवी गटाच्या अध्यक्ष मरीना मोराईश व इतर पंचसदस्य उपस्थित होते.

बाजारपेठेत कुणबी शाल निर्मितीला मोठी मागणी आहे. मात्र, त्यांचा तुटवडा भासत असल्याने या महिलांना प्रशिक्षण देऊन पाठबळ दिल्यास आवश्यक निर्मिती होणे शक्य आहे. या माध्यमातून कुणबी शाल, साडी, योगा मॅट देखील तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना मिळणार आहे.

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या प्रयत्नांतून प्रशिक्षण वर्गाची संकल्पना समोर आल्याचे खंवटे यांनी यावेळी बोलताना सांगितले. लवकरच खर्रे येथे देखील अशाच पध्दतीचा आणखी एक वर्ग सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महिला वर्गाकडे कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले तर त्या प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवू शकतात, असे सांगून पर्वरीतील महिलांनी या वर्गांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन खंवटे यांनी केले.

हस्तकला महामंडळाने हातमाग यंत्र विज्ञान पार्कात बसविले असून कच्चा मालही महामंडळ पुरवित असल्याचे बुगडे यांनी सांगितले. उत्पादने महामंडळ आपल्याकडून विकत घेते असे सांगून उत्पादन महामंडळाला न देता बाहेर विकणार असाल तर मात्र कच्चा मालाची किंमत आकारली जाते असे बुगडे यांनी स्पष्ट केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!