नाक-तोंड दाबूनच समीराचा खून…

चिखली येथील हत्या प्रकरण : आई नमिषा शुद्धीवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : चिखली येथील चिमुकलीच्या खुनाबद्दल आता खुलासा झाला आहे. चौदा महिन्यांच्या समीराचा तोंड व नाक दाबून खून झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये उपचार घेत असलेली तिची आई नमिषा शुद्धीवर आली असली तरी ती बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला नाही.
हेही वाचा:चौकशीमुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले…

नाक तोंड दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट

चिखलीच्या पोलीस वसाहतीमागील बाजूस असलेल्या बंगल्यामध्ये नमिषा हिचे वडिल राहतात. तिच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. नमिषाचे माहेर चिखलीला आहे, तर विद्यानगर झुआरीनगर येथे सासुरवाड आहे. तिचे पती जर्मनीला नोकरीला असल्याने समीरासह नमिषा तेथे राहत होती. आठ दहा दिवसांपूर्वी ती आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर शनिवारी तिच्या हातून समीराचा खून करण्याचे कृत्य घडले. समीराचे नाक तोंड दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे नाक, तोंड दाबण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला होता हे नमिषाच्या जबाबानंतरच उघडकीस येईल. 
हेही वाचा:महिलांविरुद्ध गुन्ह्यांत केवळ सातजणच दोषी…

नमिषाने जुवारी पुलावरुन घेतली पाण्यात उडी

नमिषाने हे कृत्य नैराश्यातून केल्याचे म्हटले जात आहे. तिला कोणत्या कारणास्तव नैराश्य आले होते. यासंबंधी वास्को पोलीस माहिती घेत आहेत. नमिषाचे पती हे जर्मनीहून गोव्यात पोहचल्यावर समीरा हिची शवचिकित्सा करण्यात आली. रविवारी सायंकाळी उशिरा बोगदा येथील हिंदू स्मशानभूमीत समीरावर अंतिम संस्कार करण्यात आले. समीराचा खून केल्यावर नमिषा खोलीतून बाहेर पडून पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उतरली होती. तिने आपले मोबाईल फोन, शूज तेथेच टाकले. त्यानंतर शेजारच्या घरी जाऊन त्यांची कार मागितली. कार घेऊन ती जुवारी पुलावर आली. तेथे कार उभी करून पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. परंतु तिला तेथे काम करीत असलेल्या डीबीएल कंपनीच्या कामगारांनी वाचविले.
हेही वाचा:गोव्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!