दिव्यांगजनांसाठी शुभवार्ता ! व्हीलचेअर वापरकर्त्यांचा प्रवास होणार सुकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

राज्यातील व्हीलचेअर वापरकर्त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य दिव्यांगजन आयोग व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नरत असल्याची माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

कार्यालये, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करताना व्हीलचेअर वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या कारणासाठी आयोग ई-रिक्षा खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. येत्या आठवडाभरात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
दिव्यांग तसेच वयस्कर प्रतिनिधींना मदत करण्यासाठी, पर्पल फेस्ट दरम्यान राज्यात प्रथमच व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षांचे अनावरण करण्यात आले होते. पर्पल फेस्टमध्ये मोठ्या संख्येने राज्यातील दिव्यांग प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि अशा रिक्षा राज्यात वर्षभर उपलब्ध झाल्या तर फारच सुलभ होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

“दिव्यांगांच्या सोयीसाठी सीएसआर उपक्रमातून या रिक्षा खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. चालकांसाठी एक विशिष्ट ॲप देखील लवकरच विकसित केले जाईल,” पावसकर म्हणाले.
या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्प मध्ये रूपांतरीत होतो. याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.