तेरेखोल हुतात्मे शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर अत्यव्यस्थ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सहकार्याची अपेक्षा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः गोवा मुक्ती आंदोलनात 1955 साली झालेल्या सत्याग्रहात तेरेखोल किल्ल्यावर पोर्तुगीजांनी केलेल्या बेछुट गोळीबारात शहीद झालेले शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर यांची प्रकृती अत्यव्यस्थ बनली आहे. उल्हासनगर, मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली. गोवा सरकारकडून सहकार्याची भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

तेरेखोलचे दोन हुतात्मे

गोवामुक्ती आंदोलनात 1955 साली तेरेखोल किल्ल्यावर सत्याग्रही दाखल झाले. त्यांनी गोव्यात आगमन करून भारत मात की जय असे नारे देण्यास सुरूवात हिरवे गुरूजी आणि शेषनाथ वाडेकर हे तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यासाठी पुढे सरसावले असता त्यांच्यावर पोर्तुगिज सैनिकांनी गोळीबार केला आणि त्यात हुतात्मा शेषनाथ वाडेकर (रेवदंडा) व हुतात्मा हिरवे गुरुजी (पनवेल) यांना हौतात्म्य प्राप्त झाले. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना खास आमंत्रित करून त्यांचा गौरव केला होता.

फ़ोटो के बारे में कोई जानकारी नहीं दी गई है.

वडिल गेल्यानंतर मुलांचे हाल

हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांची प्रवृत्ती नेहमी गरीब आणि सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची होती. रेवदंडा व थेरोंड्यातल्या ग्रामस्थ त्यांना राजा माणूस म्हणूनच ओळखत. त्यांच्या हौतात्म्यानंतर मात्र त्यांची मुले कायम वंचित राहिली. हौतात्म्यावेळी त्यांची मोठी मुलगी वंदना वेदपाठक-वाडेकर (7), मधली मुलगी जयश्री वेदपाठक-वाडेकर (5) व लहान भाऊ जयंत वाडेकर तीन महिन्यांचे होते. शेषनाथ वाडेकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यांची परिस्थिती चांगली होती पण ते गेल्यानंतर या मुलांच्या काकांनी या मुलांचे बरेच हाल केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून ही मुलं वंचित राहीली.

गोवा सरकारकडून मोठी अपेक्षा

तेरेखोलचे हुतात्मे शेषनाथ वाडेकर यांच्या कुटुंबियांवर मोठा अन्याय झालाय, अशी भावना त्यांच्या कुटुंबियांची बनली आहे. सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. किमान शेषनाथ वाडेकर यांच्या नातवाला एखादी सरकारी नोकरी मिळाली असती तर किमान या कुटुंबाला दिलासा मिळाला असता असेही त्यांनी गोवन वार्ता लाईव्हकडे बोलताना सांगितले. शेषनाथ वाडेकर यांच्या कुटुंबियांची माहिती सरकारने मिळवली नाही. त्यांच्या कुटुंबियांकडे संपर्क करण्याचा किंवा त्यांना शोधून काढण्याचा प्रयत्न केला नाही. केरी- पेडणे येथील नाना सोपटे केरकर यांनी एकदा या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी वाडेकर कुटुंबियांची ओळख सर्वांना करून दिली तोपर्यंत हे कुटुंब वंचितच राहीलं. नाना सोपटे- केरकर यांच्याप्रती या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जीवनदायीनीकडून भेट घेणार

तेरेखोलचे हुतात्मे शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत वाडेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेडणेच्या जीवनदायीनी संस्थेचे पदाधिकारी नाना सोपटे- केरकर आणि त्यांचे सहकारी मुंबईला जाण्याची तयारी करत आहेत. वाडेकर कुटुंबियांकडे जीवनदायीनीचे ऋणानुबंध बनले आहेत. या कुटुंबाची झालेली अवहेलना आणि हाल ही खरंतर दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

त्यांना योग्य तो न्याय मिळणे गरजेचे आहे. देशासाठी आणि आपल्या गोव्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्यांच्या नशीबी असे हाल येणे ही प्रेरणाकारक गोष्ट नाही,अशी खंत नाना सोपटे- केरकर यांनी व्यक्त केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!