‘डार्कवेब’ वरील ‘ड्रग्स’च्या जाळ्यात अडकलेल्या गोव्यातील युवकाच्या मुसक्या एनसीबीने आवळल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी 15,000 LSD ब्लॉट्स जप्त करून आणि विद्यार्थ्यांसह सहा तरुणांना अटक करून डार्क वेबवर कार्यरत संपूर्ण भारतातील ड्रग्ज तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. अधिकार्यांनी सांगितले की नेटवर्क डार्कनेटमध्ये कार्यरत होते आणि पेमेंटसाठी क्रिप्टोकरन्सी वापरतात आणि ते पोलंड, नेदरलँड, अमेरिका आणि भारतातील विविध राज्यांमध्ये पसरलेले होते.
एनसीबीचे उपमहासंचालक (उत्तर श्रेणी) ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, एका कारवाईत एलएसडी ब्लॉट्सची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.
गोवा आणि ड्रग्जचे नाते आता नवीन राहिलेले नाही. गोव्यातील तरुणांना ड्रग्जचे व्यसन लागल्याचे अधूनमधून उघडकीस येत आहे. पण, नोएडा येथे शिकणाऱ्या गोव्यातील विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केल्यानंतर चक्क आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ माजली आहे. ‘डार्क वेब’द्वारे ही टोळी ड्रग्जची तस्करी करत होती. याप्रकरणी आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

‘डार्क वेब’ द्वारे देशात आंतरराष्ट्रीय टोळी ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत असल्याची कुणकुण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) लागली होती. देशातील विविध भागांतून एलएसडीची तस्करी कुरियर व टपाल सेवेतून होत असल्याची माहितीही एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे या तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून यंत्रणा काम करत होती. याच टोळीतील नोयडातील एका विद्यार्थ्याला सोमवारी (५ जून) एनसीबीने उचलले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंमली पदार्थांशी संबंधित संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत असताना, एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गोव्यातील एका तरुणाचा, जो नोएडा येथील एका खाजगी विद्यापीठाचा विद्यार्थी होता, त्याचा माग काढला आणि एलएसडीच्या व्यावसायिक प्रमाणात तस्करी करण्यात त्याचा सहभाग असल्याबद्दल त्याला अटक केली.

त्यानंतर गोव्यातील या विद्यार्थ्यासोबत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पकडले. हे दोघेही मूळचे नोयडा येथीलच आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर दिल्लीतील एका महिलेसह केरळ आणि उत्तर प्रदेश येथून आणखी तिघांना पकडण्यात आले. अशा एकूण ६ संशयितांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 0.1 ग्रॅम एलएसडी, हॅलुसिनोजेनिक औषधाचे व्यावसायिक प्रमाण, नार्कोटिक्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाईला आमंत्रित करते, असे NCB अधिकाऱ्याने सांगितले. डार्क वेब ड्रग्स तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे गोव्यापर्यंतही पोहोचल्याने ते उखडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
बनावट मेसेजने उखडली पाळेमुळे!
- ‘डार्क वेब’द्वारे सुरू असलेली ड्रग्जची तस्करी उखडून काढण्यासाठी एनसीबीने एक पथक स्थापन केले होते. या पथकाने तपास सुरू केल्यानंतर दिल्लीतील नोयडा-ग्रेटर नोयडा येथून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचे दिसून आले होते.
- एनसीबीच्या पथकाने खोलवर तपास केला असता त्यात एका खासगी विद्यापीठातील विद्यार्थी तस्करीत गुंतल्याचे आढळून आले. त्यांनी लगेच कारवाई करत सोमवारीच त्याला अटक केली. हा विद्यार्थी गोव्यातून शिक्षणासाठी नोयडाला आल्याचे समजले.
- विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्यावर एलएसडी ड्रग्सचा साठा ‘विक्र’ या नावाने बनावट मेसेज करून मागविला होता. काश्मीर येथील एका ग्राहकाला तो पाठवणार होता. त्याच्या माहितीच्या आधारे दिल्लीतील एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे ६५० एलएसडी ब्लॉट्स जप्त केले होते.

पुण्यातही ड्रग्जची विक्री
एनसीबीने या रॅकेटमध्ये गुंतलेल्या दिल्लीतील एका तरुणीला ताब्यात घेतले. मात्र, तिच्याकडे ड्रग्ज सापडला नसला तरी तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तिचा असलेल्या साथीदाराला जयपूर (राजस्थान) येथून अटक केली. त्याच्याकडे ९,००६ एलएसडी ब्लॉट्स व २.२३ किलो गांजा मिळाला. हा साठा तो पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे पाठवणार होता, अशी कबुली दिली होती.

क्रिप्टोकरन्सीद्वारे ड्रग्जची खरेदी!
हे ड्रग्ज तस्करांचे जाळे दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत पसरले आहे. पोलंड, नेदरलँड, ब्रिटन या देशांसह भारतातील दिल्ली-एनसीआर राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश हे जाळे सक्रिय आहे. यात गुंतलेले गुन्हेगार क्रिप्टोकरन्सीद्वारे डार्क वेबवरून ड्रग्ज मागवतात, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

विद्यार्थी ठरताहेत डार्क वेबचे शिकार
विदेशातून आलेले ड्रग्ज ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडले जाते. मोठे कमिशन मिळत असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने यात ओढले जात आहेत. इतकेच नाही तर, यामध्ये उच्च शिक्षित तरुण-तरुणी, अभियंते, नामांकित कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही गुंतल्याचा संशय एनसीबीने व्यक्त केला आहे.