“जे बदल जगात पाहू इच्छिता ते आधी स्वतःपासून सुरू करा”-मंत्री काब्रालांचा कानमंत्र; केले आठव्या साय-फी महोत्सवाचे उद्घाटन

ऋषभ | प्रतिनिधी

पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. इतरांना दोष देत काहीही साध्य होत नाही. त्यामुळे जे बदल पाहू इच्छिता त्याची सुरुवात स्वतःपासून करण्याचा सल्ला काब्राल यांनी दिला. आयनॉक्स, पणजी येथे मंगळवारी आयोजित आठव्या भारतीय विज्ञान महोत्सव – 2023 च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसचे माजी संचालक डॉ. सतीश शेणॉय, गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कुमारी, धेंपो ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, विज्ञान भारतीचे सचिव विवेकानंद पै, गोवा विद्यापीठ कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन आणि विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे उपस्थित होते.

सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित डॉ. सतीश शेणॉय म्हणाले, “पाश्चिमात्य राष्ट्रांचा विज्ञानावर विश्वास आहे, जे भौतिक विश्वापुरते मर्यादित आहे. भारतीय विज्ञान मात्र नेहमीच असे मानत आले आहे की विज्ञान भौतिक क्षेत्राच्या पलीकडेही पसरलेले आहे. केवळ वैज्ञानिक मानसिकता जोपासणे पुरेसे नाही तर देशात शास्त्रज्ञ विकसित करण्याची गरज आहे. हा ध्येय पूर्ण करण्याचा एक विलक्षण प्रयत्न म्हणजे साय-फी सारखा महोत्सव होय”. विज्ञान हा आपल्या अवतीभवती सतत असतो. जेव्हा तो वर्गात शिकवला जातो तेव्हा काहीवेळा तो नीरस बनतो. त्यामुळे विज्ञानाला सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. त्याकरिता विज्ञानाला सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे आणि साय-फी हे ध्येय साध्य करण्यासाठी एक विलक्षण व्यासपीठ आहे असे प्रतिपादन ज्योती कुमारी यांनी केले.

विज्ञान आणि गणित हे विषय भारतीयांचा पिंड आहे. ब्रिटीशांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी घोकंपट्टीवर आधारित शैक्षणिक प्रणाली स्थापन केली. मात्र, आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशाचा कायापालट होणार यात शंका नाही असे मत श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केले. यावेळी सुहास गोडसे यांनी विज्ञान विषय सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांना विज्ञान क्षेत्रातील नवनवीन प्रयोगाबाबत माहिती देण्यासाठी विज्ञान भारती तसेच विज्ञान परिषद, गोवा या संस्थेने घेतलेल्या पुढाकारांबाबत माहिती दिली. प्रा. हरिलाल मेनन यांनी सर्वांचे स्वागत केले तर विज्ञान परिषद गोवाचे सचिव मनोहर पेडणेकर यांनी आभार मानले.