जाई बागायतीच्या जमिनी नावावर करा:- नाईक फुलकार समाज

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडा:- काल शुक्रवारी म्हार्दोळ इथल्या नाईक फुलकार समाजातर्फे वेलिंग प्रियोळ कुंकळ्ळी पंचायतीला शेतकऱ्यांच्या जाई बागायातीच्या जमिनी नावावर कराव्यात त्याचबरोबर दोन अडीच महिन्यापूर्वी अज्ञाताकडून लागलेल्या आगीत पूर्णपणे जाई बागायती जळून खाक झाल्यामुळे भयंकर नुकसान झाले होते. त्याचीसुद्धा नुकसान भरपाई राज्यसरकारकडून मिळावी याविषयीचे निवेदन पंचायतीच्या सरपंच हर्षा गावडे यांच्याकडे देण्यात आले.
म्हार्दोळची सुप्रसिद्ध जायाची पूजेला जवळजवळ १०९ वर्षे झाली. म्हणजेच सुमारे नाईक फुलकार समाज, जाई बागायती शंभर दीडशे वर्षापासून करीत असल्याचे इथे सिद्ध होत आहेत. शंभर-दीडशे वर्षांपासून तुटपुंज्या जमिनीवर म्हार्दोळमधील हे जाई फुलकार आपला उदरनिर्वाह करत आले आहेत. गेली अनेक वर्षे त्यांच्या जाई बागायतीना आग लावण्याचे प्रकार घडत आले असून, त्यांची बागायती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ह्या जाई फुलकाराना कसणाऱ्या जाई बागायतीशिवाय अन्यत्र कोणतीही जमीन नाही. हे फुलकार जाई व्यवसायावर कसेतरी गुजराण करतात. नाईक फुलकार समाजातर्फे पंचायतीला दिलेल्या निवेदनात बागायती जमिनी नावावर करण्याबरोबरच त्या पूनरूज्जीवित करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासंबंधीचे निवेदनात म्हटले आहे.
नाईक फुलकार समाजातर्फे आणखी एक तक्रार पत्र पंचायतीला काल सादर केलेले आहे. त्यामध्ये दत्ता नाईक यांनी नाईक फुलकार समाजाच्या श्री कृष्ण मंदिरासमोर बेकायदेशीरपणे जमीन बळकावून तिथे कुंपण उभारले असून, या कुंपणामुळे त्याचबरोबर दत्ता नाईक यांनी आपल्या गँरेज मधील भंगार वस्तू मंदिरासमोर ठेवल्यामुळे मंदिरात होणारे अनेक उत्सवांना अडचणी निर्माण होतात. यापूर्वीही या सबंधी तक्रार पंचायतीला केली होती, परंतु त्यावर योग्य कार्यवाही झाली नव्हती. परंतु आता याची सखोल चौकशी करून त्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती नाईक फुलकार समाजातर्फे करण्यात आली आहे.