जनतेचा आवाज बनणार आप: पावसाळी अधिवेशनासाठी प्रश्न पाठवा, आपचे गोमंतकीयांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, 27 जून | आम आदमी पार्टीने गोमंतकीयांना त्यांचे प्रश्न, सूचना आणि मुद्दे पाठवण्याचे आवाहन केले आहे जे येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केले जातील, असे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले आहे.
आपने सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडण्याची अभिनव प्रयोग गेल्या वर्षी सुरू केली होती. लोकांचा सहभाग लोकशाहीला बळकट बनवते. त्यामुळे यंदाही हा प्रयोग कायम राहील. गोमंतकीयांनी त्यांचे प्रश्न वा मुद्दे
[email protected] यावर पाठवावे, असे आवाहन व्हिएगस यांनी केले आहे.

यंदाचे पावसाळी अधिवेशन 18 दिवस चालणार आहे. यामुळे विधानसभेत विविध मुद्दे मांडणे सोपे जाईल. केवळ दोन आमदार असूनही, आम्ही सर्व 40 मतदारसंघांचे प्रश्न घेणार आहोत. केवळ व्यक्तीच नाही, तर स्वयंसेवी संस्था आणि पंचायतीतील अधिकाऱ्यांनी आपले मुद्दे पाठवावे असे व्हिएगस म्हणाले.
ईमेल, एसएमएस किंवा पोस्टद्वारे थेट आमदारांच्या कार्यालयात सूचना पाठवू शकतात. याशिवाय संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान बाणावली आणि वेळ्ळी आप आमदारांच्या कार्यालयाला भेट देऊन आप सदस्यांसोबत मिळून प्रश्न तयार करू शकतात, असे ते म्हणाले.

आप उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले की, आप भाजपासारखे लोकशाही विरोधी नाही. याउलट आपने नेहमीच सहभागात्मक लोकशाहीवर विश्वास ठेवला आहे. आपने नेहमीच गोमंतकीयांसंबंधित समस्या मांडल्या आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
आपचे नेते पॉल लोबो म्हणाले की, यापूर्वीच्या आमदारांनी गोमंतकीयांना ही संधी दिली नव्हती. आपच्या या उपक्रमाला लोकांचे चांगले प्रतिसाद मिळाले असून नवीन पक्ष व नवे आमदार गोव्याच्या राजकारणावर सकारात्मक प्रभाव पाडू शकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.