गोव्याच्या वकिली क्षेत्राचे पितामह एम.एस. उसगांवकर यांचे निधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट, 30 जून | गोव्यातल्या वकिली क्षेत्रातील पितामह तसेच पोर्तुगिज कायद्याचे गाढे अभ्यासक आणि पोर्तुगिज भाषेचे जाणकार एडव्होकेट मनोहर शेणवी अर्थात एम.एस. उसगांवकर यांचे शुक्रवारी ३० रोजी पहाटे वृद्धापकाळाने (90) निधन झाले. गोवा मुक्तीपूर्व आणि मुक्तीनंतरच्या काळातील पोर्तुगिज कायद्यासंबंधी राज्य आणि सर्वसामान्य गोंयकारांना त्यांनी दिलेली कायदेशीर सेवा अत्यंत मौल्यवान असून त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शुक्रवारी ३० रोजी पणजी- गोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एम.एस हे नाव कायदा क्षेत्रात बरेच प्रचलित आहे. यानंतर त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे अलिकडे त्यांना सिनिअर असेही आदराने म्हटले जात होते. एम.एस. उसगांवकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. १९५७ साली त्यांनी वकिली मिळवली. १९८९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यांना ज्येष्ठ वकिल म्हणून मान्यता मिळाली. १६ सप्टेंबर १९९६ ५ मे १९९८ पर्यंत त्यांनी भारताचे अतिरीक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. २९ मार्च १९९९ ते १ ऑक्टोबर १९९९ मध्ये ते राज्याचे एडव्होकेट जनरल राहीले आहेत. ह्याच काळात ते महाराष्ट्र आणि गोवा बर काउन्सीलचे मानद सदस्य म्हणून कार्यरत होते.
सहकार क्षेत्रातही त्यांचे महत्वाचे योगदान आहे. म्हापसा अर्बन सहकारी बँकेचे ते दुसरे चेअरमन होते. १९७३ ते १९७९ पर्यंत त्यांनी बँकेचे चेअरमनपद भूषविले. कायद्याबाबत त्यांचा अभ्यास आणि त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन १९८९ ते २००८ पर्यंत त्यांच्याकडे गोवा लॉ टाईम्स जर्नल या कायद्याशी संबंधीत पत्रिकेचे ते संपादक राहीले आहेत. वकिलीच्या व्यवसायात नव्यानेच पदार्पण करणाऱ्या नवोदित वकिलांसाठी ते मार्गदर्शक होते. आपल्या ज्ञानाचा किंवा ज्येष्ठतेचा त्यांनी कधीच अभिमान बाळगला नाही. सदोदित नवोदित वकिलांना मदत करणे तसेच वकिली क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे हा त्यांचा स्वभाव राहीला आहे. अत्यंत साधे राहणीमान, मृदू भाषा, विनोदी वृत्ती आणि त्यांच्या वाणीतील मवाळपणामुळे त्यांच्या सहवासात नेहमीच वातावरण प्रसन्न बनत असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात.
पोर्तुगिज भाषेतून राज्याची सेवा
पोर्तुगिज भाषेवर आणि कायद्यावर त्यांचा मोठा पगडा होता. गोवा मुक्तीनंतर जेव्हा जेव्हा पोर्तुगिज कायद्यांमुळे पेचप्रसंग किंवा कायदेशीर सल्ल्याची गरज पडत होते त्यावेळी त्यांची मदत घेतली जात होती. पोर्तुगिज नागरिकत्वाच्या विषयावरून निर्माण झालेल्या गोंधळावेळी त्यांनी नागरिकत्व कायद्यातील अनेक बारकावे समजून सांगितले होते. पोर्तुगिज काळातील आल्वारा, अफ्रामेंतो जमिनींच्या मालकीसंबंधीच्या विषयात ते तज्ज्ञ होते. त्यांनीच लढवलेल्या एका प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकादाराच्या बाजूने निकाल लागल्यामुळे गोवा मुक्तीनंतर आल्वारा, आफ्रामेंत जमिनी ताब्यात घेण्याचा सरकारचा डाव सपशेल फसला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी सुमारे २६०० पोर्तुगिज भाषेतील कायद्याचे लेख इंग्रजी भाषेत भाषांतरीत केले होते. गोव्यातील वकिलांना आणि न्यायाधिशांनाही पोर्तुगिज कायद्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या लिखाणाचा मोठा फायदा झाला आहे आणि होत आहे.

वकिलीचा वारसा कुटुंबातही
एम.एस. उसगांवकर यांच्या कुटुंबाने त्यांचा वकिलीचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. त्यांचे पुत्र सुदीन, सुहर्ष आणि सुदेश पैकी सुदिन आणि सुदेश हे नामंकित वकिल आहेत. त्यांचा नातु धृव हा देखील वकिलीत आपला वेगळा ठसा उमटवत आहे. त्यांच्या दुसरा नातु एड. शुक्र उसगांवकर हा गोवा विद्यापीठात पोर्तुगिज भाषेचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहे.
मार्व्हल
या नावाचे एक पुस्तक त्यांच्याविषयी अनेक दिग्गजांनी लिहीलेल्या लेखांचा संग्रह आहे. निवृत्त न्यायाधिश आर.एम.एस. खांडेपारकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. नेहमीच न्यायासाठी आणि सत्यासाठी लढा देणारे एक लढवय्ये वकिल म्हणून एम.एस. उसगांवकर यांनी आपली प्रतिष्ठा जपली. वकिली हा एक आदर्श पेशा आहे आणि त्याबाबत अजिबात तडजोड केलेली त्यांना मान्य नव्हती. अगदी शेवटपर्यंत त्यांनी आपल्या पेशाप्रतीची निष्ठा जपली.