गोवा काँग्रेस मातृभूमीप्रति प्रामाणिकच – गिरीश चोडणकर, विश्वासघात करणाऱ्या मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
पणजी, ८ जानेवारी २०२३

म्हादईप्रश्नी कर्नाटक राज्यातील सर्व राजकीय नेते हे आपल्या मातृभूमीप्रती सदैव प्रामाणिक राहिले. मात्र गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी गोव्याचा विश्वासघात केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँगेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला.
माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सरकारपासून त्यानंतर सत्तेवर आलेले गोव्यातील एकही कॉंग्रेस सरकार म्हादईप्रश्नी कर्नाटक सरकारच्या डावपेचाना व दबावाला बळी पडले नाही. कर्नाटकात गुंडू राव यांचे तसेच एस्. एम्.कृष्णा यांचे कॉंग्रेस सरकार सत्तेवर असतानाही गोव्यातील कॉंग्रेस सरकाराने म्हादईप्रश्नी त्यांच्याशी संघर्ष केला होता, याची चोडणकर यानी आठवण करुन दिली.
प्रमोद सावंत हे म्हादई ही आपली माता असल्याचा जरी दावा करीत असले तरी आपल्या राजकीय फायद्दासाठी त्यानी म्हादई मातेचा सौदा केला आहे ही गोष्ट सर्वश्रुत असल्याचा आरोपही चोडणकर यानी केला.
आम्ही कर्नाटकात कळसा-भंडुरा येथील प्रकल्प स्थळाला भेट देऊन आल्यानंतर कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवले असल्याची बाब प्रमोद सावंत यांच्या नजरेत आणून दिली होती .मात्र त्यावेळी त्यानी कर्नाटकने पाणी वळवले असल्याची गोष्ट मान्य केली नव्हती. आणि त्यावेळी त्यानी आम्हाला खोटारडे ठरवले होते. मात्र आता ते कर्नाटकने पाणी वळवले असल्याचे मान्य करीत असून ते खोटारडे आहेत व गोव्यातील जनतेने त्यांच्यावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न चोडणकर यानी केला.
अशा गंभीर विषयावर खोटारडेपणा करणा-या प्रमोद सावंत यानी राजीनामा द्यावा ,अशी मागणी चोडणकर यानी केली.