गोवन वार्ता लाईव्ह | EXCLUSIVE मुलाखत |…तर भाजपला सोडचिठ्ठी ! मडकईकरांकडून नव्या पक्षाचं सुतोवाच
ऋषभ | प्रतिनिधी
ओल्ड गोवा : भाजपचे आघाडीचे नेते आणि राज्याचे माजी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची गोवन वार्ता लाईव्हचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी एक्सक्लूझीव्ह मुलाखत घेतली. यावेळी अनेक विषयांवर मडकईकरांनी आपली मते नोंदवली. अनेक विषयांवर त्यांची नाराजीदेखील यावेळी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून आली.
राजकीय आणि मॅडीकल आरक्षणावरुन मडकईकर आक्रमक
सर्वप्रथम मडकईकरांनी हात घातला तो एसटींच्या राजकीय आणि मॅडीकल आरक्षणच्या मुद्याला. ते म्हणाले “एससी एसटीच्या राजकीय आणि इतर बाबतीतल्या आरक्षणाच्या अनुषंगाने समाजाचे नेते अनेक सीनियर नेत्यांना भेटतात ही चांगलीच गोष्ट आहे, तरी सरकारने उशीर होण्याआधीच ठोस पाऊल उचलले तर चांगले होईल.” याआधी पर्रीकरांशीही त्यांनी याबाबत पुष्कळदा चर्चा केली असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. आरक्षण लागू झाल्यास मागासलेल्या समाजातील होतकरू तरुण-तरुणीही मुख्य प्रवाहात येतील असे मत त्यांनी मांडले.
स्मार्ट सिटीची सुरू असलेली कामे मान्सून आधी होतील पूर्ण
गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर राज्यातील बहुजनांमध्ये माजली दुफळी
समाजात जी दुफळी निर्माण झाली त्यास कारणीभूत फक्त आणि फक्त स्वतःचा टेंभा मिरवणारे स्वार्थी राजकीय नेते आहेत असा घणाघाती टोला मडकईकरांनी लगावला. गोवा स्वतंत्र होताना जो समाज एका छताखाली होता तोच समाज आज विविध झेंड्यांखाली विभागला गेला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. समाजाचेच नेते आपल्याला हमखास एकमेकांचे पाय ओढताना दिसतात व गेल्या निवडणुकीत आपल्याला याचा बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे, असेही ते म्हणाले. ‘स्वार्थी लोक’ कुंभारजुवे मतदारसंघात येऊन एसटी समाजातील महिलेला मते देऊ नका महणून उघडपणे सांगत होते. आणि याच कारणांमुळे जनिता मडकईकरांचा पराभव झाला असेही ते सांगायला विसरले नाहीत.
राज्याचा कारभार योग्य दिशेने सुरु नाही
राज्याचा कारभार जो मनोहर भाईंनी सुरू केला होता तो राज्यकारभार आज हवा तसा चालवला जात नाही. मंत्रिमंडळात आता पाहिले तर ऑलिंपिक स्पर्ध्याच जणू सुरू असल्याचे आपणास दिसून येते. राज्याचा विकास आणि भरभराट राहिला बाजूलाच यांना फक्त स्वतः कसे लाईमलाईटमध्ये राहता येईल, चकाकणाऱ्यां कॅमेऱ्याच्या फ्लेश मध्ये आपलेच रुपडे कसे कायम असेल याच भावनेने काही जणांचा कारभार चालू आहे, अशा खर शब्दांत त्यांनी तथाकथित चमचेगिरी करणाऱ्यांवर टीका केली. पुढे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतही या गोष्टींपासून काही अनभिज्ञ राहिलेले नाहीत अशी कोपरखळी त्यांनी मारली.
माझे नेतृत्व फक्त तिसवाडीपुरतंच मर्यादीत नाही
अनेक ठिकाणांहून लोकं मला येऊन भेटलेली आहेत आणि एखादा नवीन पक्ष देखील सुरू केल्यास आपल्या मागे ती लोकं समर्थपणे उभे राहतील. तसेच डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन समाजकारणाचे राजकारण करणाऱ्या प्रगल्भ नेत्यांची किंवा राजकीय पक्षांची गोवा राज्यात सध्या वानवा आहे अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. आणि माझ्या नेतृत्वाला काही तालुक्याच्या किंवा कोणत्याही भागाच्या सीमेचे बंधन नाही, कोठेही उभे राहून निवडणूक लढवली तर जिंकून येण्याची हिंमत मी राखून आहे. एका शब्दाने मी मुख्यमंत्री बनू शकतो असेही मत त्यांनी नोंदवले. काही लोकांनी तर आपली उमेदवारी नाकारली जावी याकरिता देखील आपली शक्ति आणि पैसा दोन्ही खर्च केली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बुद्धिबळाच्या सोंगट्या, डाव संपला की एकाच पेटीत बंद होतात
कॉँग्रेसकडून निवडणूक जिंकलेलें, एका वर्ष संपायच्या आत असे काय बुवा भाजपात आले ? याचा अर्थ या दोघांमध्ये आधीपासूनच साटे लोटे होते यावर शिकामोर्तब झालेय. हे सगळे एकमेकांच्या सुख दुखाचे सोबती आहेत आणि जनतेच्या हिताचे यांना काहीही पडलेले नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने केंद्रीय नेत्यांची येथे जास्त चालते. पण मुख्यमंत्री एका चांगल्या व्यक्तिमहत्वाचे मालक असून त्यांच्याबद्दल आपणास काही आकस नाही.
साखळी आणि फोंडा पालिका निवडणुकीचे बिगूल वाजले. दिग्गजांच्या राजकीय कौशल्याचा लागणार कस !
मी संपणार नाही, मी देवाचं ‘स्पेशल एडीशन’
नवीन पक्ष स्थापन करून जर ED आणि पोलिस यंत्रणेचा ससेमिरा जर तुमच्या मागे लागला तर ? असा सवाल ज्यावेळी मडकईकरांना करण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की ” मी संपणार नाही, मी देवाचं ‘स्पेशल एडीशन’. मी काही समयांनी माणूस नाही, माझा जन्म विशेष कामगिरी करण्यासाठीच झालाय अन्यथा 4-5 वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या आजारातून बरा होऊन पुन्हा जोमाने कामाला लागलोच नसतो ! आपल्या कार्यकिर्दीत तब्बल 2000 लोकांना नोकऱ्या दिल्याचेही त्यांनी तोंडी दाखले दिले. मी अजूनही भाजपचाच कार्यकर्ता आहे, पक्ष त्याग केलेला नाही. जर एसटी आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित तडीस लावण्यात सरकार आणि पर्यायाने भाजप अपयशी ठरला तर मी पक्ष सोडायला देखील मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या चिंता मांडल्या.