गोमंतक मराठी अकादमी अध्यक्षपदी प्रदीप घाडी आमोणकर तर उपाध्यक्षपदी नरेंद्र आजगावकर, सर्व सदस्यांची बिनविरोध निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पर्वरीः प्रतिनिधी – गोमंतक मराठी अकादमीच्या आज झालेल्या आमसभेत २०२३-२५ या तीन वर्षांसाठी प्रदीप घाडी आमोणकर यांची अध्यक्षपदी तर नरेंद्र आजगावकर यांची उपाध्यपदी बिनविरोध निवड झाली. गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यकाररी मंडळावरील सर्व सदस्यही बिनविरोध निवडून आले.

पर्वरी- गोमंतक मराठी अकादमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर व उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर (डावीकडून पाचवे व सहावे), उजवीकडून अनुक्रमे प्रकाश कळंगूटकर, प्रभाकर ढगे, प्रकाश धुमाळ, श्यामसुंदर कवठणकर,सुदेश कोचरेकर, महादेव गवंडी, भारत बागकर.

पर्वरी येथील मराठी भवनात सकाळी १० वाजता आमसभेला सुरूवात झाली. अकादमी सचिव भारत बागकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त व जमाखर्च सादर केला. प्रदीप घाडी आमोणकर यांनी गेल्या तीन वर्षातील आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत झालेल्या कार्याचा आढावा घेतला. गोमंतक मराठी अकादमीला गतवैभव प्राप्त करून देणे आणि मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी संस्कार केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमोणकर यांनी दिली.
सुदेश कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक समितीचे सदस्य म्हणून महादेव गवंडी व श्यामसुंदर कवठणकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

पर्वरी- गोमंतक मराठी अकादमीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर व उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांच्यासह कार्यकारी मंडळ तथा आमसभा सदस्य.


गोवा विद्यापीठ, महाविद्यालये, उच्च माध्यमिक, माध्यमिक, प्राथमिक विद्यालये, राज्यात राहणारे मराठी साहित्यिक, मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्ते तसेच आमसभेने सूचित केलेल्या अशा १२ प्रतिनिधी पदासाठी प्रत्येकी एक अर्ज असल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. गोमंतक मराठी अकादमी कार्यकारी मंडळावर अनुक्रमे भारत बागकर, प्रकाश धुमाळ, प्रभाकर ढगे, महादेव गवंडी, श्यामसुंदर कवठणकर, सुदेश कोचरेकर व प्रकाश कळंगूटकर यांची निवड करण्यात आली. हेमंत दिवकर, रवींद्र बोरकर, उदय मांद्रेकर व रोहिदास नाईक हे विविध गटातून आमसभा सदस्य म्हणून निवडून आले.


गोमंतक मराठी अकादमीच्या पुढील वाटचालीविषयी प्रकाश धुमाळ, हेमंत दिवकर, नारायण नाईक, प्रभाकर ढगे, स्नेहा धारगळकर, रोहिदास नाईक, पराग वेळुस्कर यांनी आपली मनोगते व्यक्त करताना अनेक उपक्रम सूचवले. समारोप करताना उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील गौव्यातील मराठी भाषिकांचे शक्तीस्थळ असलेली गोमंतक मराठी अकादमी सर्वांच्या सहकार्याने आपण टिकवली आहे. गोव्याच्या संस्कृतीचा खरा आधार असलेली मराठी टिकवून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!