गोमंतकाच्या समृद्ध इतिहासातील काळा आध्याय : पोर्तुगीजांनी गोव्यातील जनतेवर केलेले धार्मिक अत्याचार व त्यास कारणीभूत ठरलेल्या युरोप मधील घटना यांचा संक्षिप्त इतिहास- भाग १
कदाचित त्यांच्या धर्मांधतेच्या अतिउत्साहामुळेच, गोव्यातील पोर्तुगीज इंक्विझिशन, सर्व पोर्तुगीज प्रदेशांमध्ये सर्वात कठोर आणि क्रूर असा अध्याय ठरला व त्यांच्यावर बिंबवलेल्या धर्मवेडया मानसिकतेमुळेच पोर्तुगीज अधिकाधीक क्रूर बनत गेले .

ऋषभ | प्रतिनिधी

४५१ वर्षे गोवा हा भारतातील पोर्तुगीजांच्या तीन अविभाज्य प्रांतांपैकी एक होता. इतर दोन प्रांत म्हणजे दमण आणि दीव. 1961 मध्ये भारताने या तिन्ही प्रदेशांवर आक्रमण करून, त्यांना मुक्त करून आपल्यात समाविष्ट केले. शतकानुशतके, गोव्याला पूर्वेकडील रोम मानले जात होते. हे ओरिएंटमधील कॅथोलिक चर्चचे मुख्यालय होते. 1552 मध्ये मरण पावलेल्या फ्रान्सिस झेवियरची कबर गोवा (वेल्हा गोवा) जुन्या शहरातील इग्रेजा डो बॉम जीझसमध्ये आहे.

गोवा हे त्यांच्या सागरी साम्राज्याचे केंद्र होते. विजापूरचा सुलतान युसूफ आदिल शाह याचा पराभव करून १५१० मध्ये पोर्तुगीज गोव्यात सत्तेवर आले. त्यांनी त्यांची पहिली राजधानी वेल्हा गोव्यात स्थापन केली आणि अशा प्रकारे राज्यात त्यांच्या चार शतकांच्या प्रदीर्घ राजवटीला सुरुवात झाली. यावेळी, त्यांनी स्थानिक हिंदूंना रोमन कॅथलिकांमध्ये बळजबरीने धर्मांतरित करण्याच्या उद्देशाने गोव्यातील लोकांवर त्यांचे कुप्रसिद्ध ‘इन्क्विझिशन’ लादले. ही इन्क्विझिशन प्रामुख्याने हिंदूंवर सामाजिक नियंत्रणाची एक पद्धत होती आणि नवधर्मांतरित कॅथलिक, ज्यांची त्यांना भीती वाटत होती, त्यांनी बंद दरवाजाआड त्यांच्या जुन्या धर्माचे पालन सुरूच ठेवले. नंतर, हेच इन्क्विझिशन पोर्तुगालमधील ज्यूंवरही, काही जुन्या ख्रिश्चनांसह आणि नवीन धर्मांतरितांवरही ते लादण्यात आले. धर्मांतरण हे इन्क्विझिशनर्स कडून आपल्याला हवे ते ईप्सित साध्य करण्याचे साधन बनले.

यूरोप मधील पार्श्वभूमी :

मिशनरी फ्रान्सिस झेवियर ने १६ मे १५४६ रोजी पोर्तुगालचा राजा जॉन तिसरा याला पत्राद्वारे विनंती केल्यावर गोव्यात इन्क्विझिशनची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली. राजा जॉन तिसरा याने त्या वेळेस , इन्क्विझिटर जनरलला शाही घराण्यांपेक्षाही उच्च दर्जा दिला होता व आपले शाही अधिकार पूर्णपणे “जिझस कंपनी”च्या स्वाधीन केले होते. जेसुइट्सना शक्य तितके व्यापक अधिकार दिले गेले होते ज्यामुळे अनेक विक्षिप्त घटनांना वाट मिळाली. समाज आता तर्क-वितर्क किंवा चांगले वाईट यांच्या परिणामांवर नाही तर धर्माच्या होकायंत्रावर नियंत्रित होऊ लागला होता .

“जिवंतपणी केलेल्या कर्माचा बोजा मरणानंतर देखील पाठीवर वागवावा लागतो”, अशाप्रकारच्या शिकवण्यांमुळे आणि त्याच्या गूढ निष्क्रियतेमुळे ख्रिश्चन धर्माने समाजात उदासीनतेची स्थिती निर्माण केली. पाद्रीसमोर बंद खोलीत कनफेशन किंवा कबुलीजवाब दिला की जन्म-मृत्यूचे भय, वास्तववाद, अस्तित्ववाद यांचा विचार हा विकार बनत नाही अशी एक सामान्य धारणा त्या वेळी समाजात भिनली होती. धर्माचे पांघरूण पांघरून धर्मवेड्यांनी सगळे समाजिक आणि माणुसकीला अनुसुरून असणारे नियम वेशीवर टांगले . याच दरम्यान अनेक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ जे धर्माच्या शिकवणी विरुद्ध जाऊन समाजाला वेगळ्या मार्गाकडे जाण्यास उद्युत करीत त्यांचा क्रूरपणे भर चौकात गिलोटीनने शिरच्छेद करत हत्या केली गेली.

इन्क्विझिटर जनरल धर्मांध होऊन सत्तेच्या सत्तेच्या नशेत एवढा निर्ढावला की त्याने आपला राजा जॉन चौथा जो जून १५५६ च्या दरम्यान मरण पावला त्यास बहिष्कृत करण्यापर्यंत मजल मारली. “मेलेल्या मनुष्य हा धर्माच्या वैरी असून त्यांचे शुद्धीकरण करूनच त्याला पुढील प्रवासासाठी उद्युत केले पाहिजे” अशी ठाम श्रद्धा त्यावेळी तत्कालीन समाजात भीनली होती किंबहुना त्यांच्या या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या गेल्या होत्या.
1862 मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनमधील फ्रेंच कमिशनर लॉर्ड आल्फ्रेड डेमर्से यांनी लिस्बनच्या पुरातन संग्रहांची तपासणी करताना लिहिले: ‘ “तूर्तास हाती आलेल्या कागद पत्रांनुसार इन्क्विझिशन आणि जिजस कंपनीने केवळ 40,000 खटल्यांची कार्यवाही केली आहे, व पूर्ण जगभर जवळ जवळ ५ लक्ष किंबहुना जास्तच लोकांची कत्तल केली आहे . ही शापित पाने इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरतात . या दुष्ट संस्थेचा इतिहास हा कादंबरीकार आणि मेलोड्रामाच्या लेखकांसाठी एक अक्षय खाण आहे.”
आणि त्या घटनांचे गोव्यात उमटलेले पडसाद…
तसे पाहता 1561 मध्ये अलेक्सो डायस फाल्काओ आणि फ्रान्सिस्को मार्क्स, यांच्या तर्फे इन्क्विझिशन रीतसर सुरू झाले आणि 1774 मध्ये तात्पुरते थांबले, असे मानले जाते की मोहिमेच्या पहिल्या ३ महिन्यातच 16,000 पेक्षा जास्त गैर-कॅथलिक (मुख्यतः हिंदू) धर्मांतरणांच्या खटल्यांकरिता उभे केले गेले. पहिल्या काही महिन्यांत 4,000 हून अधिक लोकांना पोपच्या आदेशाची पायामल्लि करण्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली, तर त्यातील १/४ लोकांना एकतर जीवंत जाळले तरी गेले किंवा जीवंत असतानाच त्यांची कातडी सोलून त्यांचे तुकडे केले गेले.

फ्रेंच इतिहासकार आणि तत्त्वज्ञ व्होल्टेअर यांची तत्कालीन टीप्पणे नमूद करतात त्याप्रमाणे, “गोवा हे त्याच्या व्यापार आणि वाणिज्य सुविधांपेक्षा इन्क्विझिशनसाठीच दुर्दैवाने प्रसिद्ध आहे, जे मानवतेच्या विरुद्ध आहे.” पोर्तुगीज भिक्षूंनी आणि पादरींनी पोप निकोलस कडे भारतीय जनता सैतानाची उपासना करत होती असे एक चित्र उपस्थित केले, यामुळेच इन्क्विझिशनची प्रक्रिया कधी नव्हती तेवढ्या जोरात चालूच राहिली.

पोर्तुगीज वसाहतवादी सरकारने अनेक हिंदुविरोधी कायदे आणि प्रतिबंध आचरणात आणले . उदाहरणार्थ, ख्रिश्चनांना हिंदूंना त्यांचे कर्मचारी म्हणून ठेवण्याची परवानगी नव्हती आणि हिंदूंना कोणत्याही प्रकारची सार्वजनिक पूजा करण्याची परवानगी नव्हती. अनेक प्रतिबंधात्मक धार्मिक कायदे देखील आचरणात आणले गेले ज्यात हिंदू वाद्ये आणि कपड्यांवर बंदी समाविष्ट होती. बहुसंख्य हिंदू मंदिरे नष्ट झाली किंवा चर्चमध्ये रूपांतरित झाली आणि अनेकदा नष्ट झालेल्या मंदिरांतील साहित्य या चर्च बांधण्यासाठी वापरण्यात आले. संपूर्ण इन्क्विझिशनच्या काळात अनेक महत्त्वाचे हिंदू ग्रंथ जाळण्यात आले आणि ख्रिश्चन धार्मिक ग्रंथ जबरदस्तीने हिंदूंवर लादण्यात आले. तसेच शेंडी-कर देखील लादण्यात आला.

गोव्याचा तत्कालीन व्हाइसरॉय, अँटाओ डी नोरोन्हा आणि गव्हर्नर अँटोनियो मोनिझ बॅरेट यांच्या आदेशानुसार, अनाथ हिंदू मुलांना तात्काळ नेऊन गोवा शहरातील जीझस सोसायटीच्या सेंट पॉल कॉलेजकडे सोपवण्याचा आदेश देण्यात आला. तेथे चर्चच्या फादर्सनी त्या मुलांना बाप्तिस्मा देऊन धर्मसंस्कार दिले, त्यांना शिक्षण देवून त्यांना त्यांच्या कुवतीनुसार व आपल्या गरजेनुरूप तत्कालीन समाजाच्या महत्वाच्या पदांवर नियुक्त केले गेले, यामुळे समाजव्यवस्थेवर बऱ्याच प्रमाणात पोर्तुगीजांनी पकड मिळवली . अनाथांव्यतिरिक्त, बहुतेकदा पालकांसह हिंदू मुलांचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर केले गेले आणि अशा छळाची पातळी इतकी होती की अनेक हिंदू कुटुंबांनी त्यांच्या मुलांची गोव्यातून गुपचुप आपल्या बाहेरच्या प्रदेशांतील नातलगांकडे रवानगी केली , काहीनी धर्मांतरण स्वीकारले व जे यापैकी काहीच नाही करू शकले ते जिवानिशी गेले.

हेही वाचाः अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ ते ३१ मार्च दरम्यान
अनेक कुटुंबांनी त्यांचे जीव वाचवण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि या सुरुवातीच्या धर्मांतरितांपैकी काहींना भरपूर बक्षीस मिळाले. भोजांची प्राचीन राजधानी चंद्रपूर (चांदोर) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारणारे पहिले कुटुंब ब्रागांझा कुटुंब होते. त्यांना जगाच्या विविध भागांमध्ये व्यापार हक्क बहाल करण्यात आले, ज्याचा परिणाम म्हणून हे कुटुंब अल्पावधीतच प्रचंड श्रीमंत झाले आणि त्यांनी एक मोठा वाडा बांधला जो गोव्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या पोर्तुगीज व्हिलापैकी एक आहे. या भव्य घरांचे भव्य आतील भाग अजूनही प्रतिबिंबित करतात आणि एका खोलीतून दुसर्या खोलीत जाताना या कुटुंबांना धर्मांतरानंतर मिळालेल्या अफाट संपत्तीची आणि शक्तीची कल्पना करता येते.


(संदर्भ: Lettres sur l’origine des Sciences et sur celle des peuples de l’Asie; प्रथम प्रकाशित पॅरिस, 1777, 15 डिसेंबर 1775 चे पत्र).