‘ती’ हत्या दारुच्या नशेत करण्यात आली की आणखी काही कारण? तपास सुरु!

रशियन तरुणीच्या हत्येप्रकरणी संशयिताला अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : ओशेल-शिवोली १९ ऑगस्टला आढळलेल्या रशियन तरुणीच्या मृतदेहाबाबत धक्कादायक खुलासा शनिवारी करण्यात आला होता. या तरुणीची हत्याच झाली असल्याचं पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं. त्यानंतर आता एका रशियन नागरिकालाही ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरु आहे. दारुच्या नशेत या तरुणीचा जीव घेतला गेला की आणखी काही कारण होतं, याचा शोध आता सुरु आहे.

घटनाक्रम काय आहे?

बंदीरवाडा ओशेल शिवोली येथे मृत्तावस्थेत सापडलेल्या एकाटेरीना तितोवा या 34 वर्षीय रशियन युवतीचा खून झाला होता. या खूनप्रकरणी तिचा मित्र डेनिस क्रीऊचकोय या ४७ वर्षांच्या संशयित रशियन नागरीकास हणजूण पोलीसांनी शनिवारीच अटक केली. १९ ऑगस्टला ही घटना घडली. संशयित आरोपीच्या खोलीमध्ये मयत एकाटेरीना ही मृत्तावस्थेत सापडली होती. तेव्हापासून संशयित फरार होता.

या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. शुक्रवारी रशियन लवादाच्या हजेरीत मयतीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आलं. यात मयतीचा मृत्यू नैसर्गिक नसून तर नाक, तोंड तसेच गळा दाबून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झालं.

अखेर संशयिताला बेड्या

नंतर पोलिसांनी भाडेकरू असलेल्या संशयिताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो घटनेच्या दिवसापासून फरार होता. या दरम्यान संशयित विशाखापट्टम (व्हायझॅक) इथं पसार झाला. दोन दिवसांपूर्वीच तो गोव्यात परतला होता आणि ओशेल शिवोली येथे आपल्या एका विदेशी मित्राच्या घरी लपून बसला होता.

हणजूण पोलिसांनी म्हापसा पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या मदतीनं संशयिताचा शोध घेतला. त्यानंतर त्याला पकडून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित आरोपी विरूध्द कलम 302 कलमाखाली गुन्हा नोंद केलाय आणि संशयित डेनिसला अटकही केली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरज गावस, तुषार लोटलीकर, राहूल परब, उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर, सुजय कोरगांवकर, अमीर तरल, स्नेहा सावळ, हवालदार श्यामसुंदर पार्सेकर, राजेश गोखर्णकर, रूपेश आजगांवकर, सर्वेश साळगांवकर, गाधीश गोलतेकर, शंभा शेटगांवकर, अरूण महाले, शुभम मयेकर, अजय गांवकर, शुभम नाईक, सखाराम साळगांवकर आणि अर्जुन सावंत या पथकाने म्हापसा पोलीस आणि क्राईम ब्रांच पोलिसांच्या साहाय्याने केली.

हेही वाचा – विषारी कोब्रा आणि महिलेच्या डमीसोबत पोलिसांनी रिक्रिएट केला उत्तरा हत्या प्रकरणातील सीन; समोर आले हे सत्य

घटना उघडकीस कशी आली?

धक्कादायक बाब म्हणजे संशयिताने 18 ऑगस्टला मयत युवती आणि अजून एका रशियन युवतीला आपल्या घरी दारू पिण्यासाठी बोलावलं होतं. मयत युवती ही हरमल इथं तर दुसरी युवती पार्से इथं राहत होती. तिघांनीही 19 ऑगस्टला पहाटेपर्यंत दारूचे सेवन केले. मयत युवती बेडरूममध्ये जाऊन झापली. तर तिची ती मैत्रिण बाहेरील सोफ्यावर झोपली होती. हीच संधी साधून संशयिताने मयती रशियन तरुणीचे हाताने नाक, तोंड तसंच गळा दाबून खून केला आणि तो तिथून पसार झाला, असा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, घटनेच्या दिवशी मयत रशियन तरुणीची मैत्रिण संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास झोपेतून उठली. तेव्हा आपली मैत्रिण मृतावस्थेत पडल्याचे तिच्या ध्यानात आलं. त्यानंतर तिने धावपळ करून या घटनेची माहिती पोलीसांना दिली होती.

हत्येचं कारण काय?

विशेष म्हणजे संशयिताने दारूच्या नशेत मैत्रिणीचा खून केला की यामागे आणखी काही कारण आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित आरोपी पोलिसांना चौकशीवेळी सहकार्य करत नसल्याचीही माहिती समोर आली आहे. संशयित ओशेल शिवोली येथे गेल्या 18 महिन्यांपासून वास्तव्यास होता. संशयिताकडे असलेले पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे बनावट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा – एनसीबीची मुंबईत मोठी कारवाई

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!