कोलवाळ कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
म्हापसा : तुरूंग प्रशासन व अधिकार्यांची कोलवाळ कारागृहावरील सुरक्षिततेची वचक ढिली पडल्याने कैद्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ड्रग्स व मोबाईलचा खुले आम वापर, कर्मचार्यांना दमदाटी करणे, तसेच कैद्यांचे पलायन हे प्रकार याच निष्काळजीपणातून घडत आहेत. सुरक्षा यंत्रणा ढिली पडल्यामुळेच महिन्याभरात दोन कैदी तुरूंग प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत.
कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेची कैद्यांकडून मोडतोड झाली आहे. कन्विक्ट व अंडरट्राईल या विभागांसह इतर विभागाच्या प्रवेशद्वारावर कॅमेरे होते. त्यामुळे कैद्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. ही यंत्रणा वर्ष उलटले तरीही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. कॅमेराच्या देखभालीसाठी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला मात्र करोडो रूपये दिल्याची माहिती समोर आली आहे. शंभर कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा वापर होऊ नये म्हणून जामर बसविण्याची योजना होती; पण ती योजना पाच वर्षे धूळखात पडून आहे. मोबाईल जामर बसविण्याबाबत तुरूंग प्रशासन व गृह खात्याने मवाळ भूमिका घेतल्यामुळेच कारागृहात सर्रासपणे मोबाईलचा वापर केला जातो.
शिवाय ड्रग्ज व इतर अमलीपदार्थ कैद्यांपर्यंत छुप्या पद्धतीने पोहोचविले जातात. याबाबतचा खुलासा धाड व झडतींवरून झालेला आहे. गेल्या पाच वर्षांत ड्रग्ज व इतर गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या कित्येक कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्याचा बोध मात्र कर्मचारी वर्गाकडून घेतला जात नाही. ड्रग्स प्रकरणातील अंडर ट्रायल कैदी हेमराज भारद्वाज हा 25 ऑगस्ट रोजी पसार झाला होता. मंगळवारी ब्रिटीश महिलेवर बलात्कार व चोरीच्या गुन्ह्यांतील अंडरट्रायल कैदी रामचंद्र चेंडायेलाप्पा याने पलायन केले. कारागृह सुरक्षा यंत्रणा भेदून या कैद्यांनी पोबारा केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवर्यात सापडली आहे.
ड्युटीवरील जेलरने सर्व विभागामध्ये सकाळ व रात्रीची फेरी मारून सर्व सुरळीत आहे की नाही याची शहानिशा करायला हवी. तसेच कारागृहातील सहाही टेहळणी टॉवरवर तैनात राखीव दलाचे जवान व मुख्य फाटकांवर जेलरने फेरी मारून तपासणी करायला हवी. पण ही फेरी मारलीच जात नाही. रामचंद्र चेंडायेलाप्पा हा कैदी पळून गेला, तेव्हा सर्व टेहळणी नाक्यावरील जवान झोपल्याचे आढळून आले होते. कैद्यांची सकाळी व सायंकाळी हजेरी घ्यायचा नियम आहे. सकाळची हजेरीवेळी ड्युटी संपलेला कर्मचारी तेथे तैनात असायला हवा; परंतु ही हजेरी व्हायच्या आधीच सदर कर्मचारी घरी पोहोचलेला असतो. सकाळी 6 वा. चहा-पाणी व आंघोळीसाठी कैद्यांचे विभाग उघडले जाते. नंतर 10 वा. बंद करून दुपारी 12 वा. जेवणासाठी उघडून बंद केले जाते. पुन्हा 3 वा. उघडले जाते व सांयकाळी 6 वा. बंद करण्याचा नियम आहे. पण सांयकाळी 6 वा. कैदी विभाग बंद न करता ते रात्री 8 पर्यंत खुले ठेवले जाते. त्यामुळे कैद्यांच्या मनमानी व दहशतीमध्ये मोठी भर पडली आहे. शिवाय अधिकार्यांकडून जेलर व सहाय्यक जेलरची कार्यवही देखील तपासली जात नाही. कर्मचारी ऐनवेळी ड्युटी मास्तरला फोन करून आपण रजा घेत असल्याचे सांगतोे. शिवाय ठरल्यावेळेत हे कर्मचारी हजेरी लावत नाहीत. त्यामुळे ऐनवेळी कर्मचार्यांची कमतरता भासते. याबाबतची शहानिशा वरीष्ठ अधिकार्यांनी करायला हवी. नागरी सेवेतील अधिकारी याबाबतची तपासणी करत नाहीत. तसेच काही कैद्यांना पॅरोलवर पॅरोल देऊन त्यांना घरी जाण्यास मुभा दिली जाते. अशाप्रकारे कारागृहात मनमानी कारभार सुरू आहे. या कारणास्तव कैद्यांचा बेशिस्तपणा वाढला आहे.
कारागृह सुरक्षेसाठी मोठा ताफा तैनात
सहाय्यक अधिक्षकांसह दोन प्रभारी जेलरसमवेत पाच जेलर, आठ सहाय्यक जेलर, 13 हवालदार (हेडगार्ड) व शंभरच्या आसपास जेल गार्ड शिवाय एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व 50 पेक्षा जास्त भारतीय राखीव दलाचे सशस्त्र जवान मिळून कारागृहात सुरक्षिततेसाठी मोठा ताफा आहे. कारागृहात महिला विभागाव्यतरिक्त एनडीपीएस, मेस, कन्विक्ट, अंडर टायल, करोना पॉझिटीव्ह, नवे भरती कैदी, पनिशमेंट व वास्को विभाग मिळून आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागानुसार दर दिवशी आठ हवालदार व सहाय्यक जेलर सदर विभागाच्या सेवेवर तैनात करायला हवेत. पण दोन-तीन विभागावर एक हवालदार व एक जेलर तैनात केला जातो.