खवंटेकडून गोवा अॅप तर मॉविनकडून गोवा माईल्स च्या ऑफर्स, पेडणेकर मात्र येलो- ब्लॅक काउंटरवर ठाम

ऋषभ | प्रतिनिधी

पणजीः मोपा विमानतळ सुरू व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत. गेले वर्षभर झोपी गेलेले राज्य सरकार आता शेवटच्या क्षणी पेडणेकरांना टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ पाहत आहे. पर्यटनमंत्री रोहन खवंटे गोवा अॅपचे समर्थन करताहेत तर वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो गोवा माईल्सला सामील व्हा, असा अट्टाहास धरून आहेत. पेडणेकर मात्र त्यांना हक्काचा येलो-ब्लॅक काऊंटरच हवा, या मागणीशी ठाम असून सोमवारी दिवसभराच्या चर्चेत शेवटपर्यंत ठोस निर्णय होऊ शकला नाही.

टॅक्सीच्या विषयावरून सोमवारी नागझर येथे पेडणेतील टॅक्सी व्यवसायीक आणि इच्छुकांनी आंदोलन पुकारले होते. यावेळी पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी तिथे भेट देऊन आपण या विषयावर तोडगा काढू,असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून त्यांनी एका शिष्टमंडळाला पर्वरीत बैठकीसाठी येण्याची विनंती केली. यावरून एक शिष्टमंडळ पर्वरीत दाखल झाले. यावेळी या चळवळीचे नेते तथा आरटीआय कार्यकर्ते सुदिप ताम्हणकर हे असतील तर बैठक होणार नाही,अशी अट घालण्यात आली. यापूर्वी ताम्हणकरांच्या अनुपस्थितीत चर्चेसाठी येणार नाही,असा पवित्रा संघटनांनी घेतला होता. परंतु आता विमानतळ सुरू होण्यास केवळ दोन दिवस शिल्लक राहील्याने चर्चेतून प्रश्न मिटत असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे,असा विचार करून हे शिष्टमंडळ चर्चेसाठी राजी झाले.

पर्वरीत बोलावलेल्या शिष्टमंडळाला तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर चर्चेला बोलावण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो यांच्यासहित पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हजर होते. बैठकीच्या प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी सरकार पेडणेकरांचे हित जपण्यासाठी किती प्रामाणिक आहे आणि टॅक्सी व्यवसायात पेडणेकरांना प्राधान्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या आहेत,असे सांगितले. विमानतळ सुरू होण्यास दोन दिवस बाकी असतानाच या गोष्टी कशा काय सूचल्या. किमान एका वर्षापूर्वी या योजना का उघड केल्या नाहीत, या प्रश्नावर मात्र सगळ्यांचीच बोलती बंद झाली.

पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी गोवा अॅपमध्ये सामील होण्यासाठीच्या ऑफर्स सांगितल्या. या अॅपमध्ये सामील होणाऱ्यांना वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतील, तसेच क्यू सिस्टीममध्ये पेडणेकरांना प्राधान्य देऊ,असे सांगितले. तिकडे वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी गोवा माईल्समध्ये सामील होणाऱ्यांना शंभर वाहने देण्याची योजना जाहीर केली. आगाऊ रक्कम कंपनी भरेल. वाहनधारकांना केवळ पाच वर्षे कर्जाचा हप्ता भरावा लागेल आणि पाच वर्षांत वाहन नावावर केले जाईल,असेही सांगितले. पेडणेकर हट्ट धरून बसले तर भविष्यात ओला आणि उबेरही आणावे लागतील,असा इशाराही देण्यास मॉविन गुदीन्हो मागे राहीले नाहीत. हे सगळे झाल्यानंतर शिष्टमंडळाने या विषयावर अधीक चर्चा न करता केवळ येलो- ब्लॅक काउंटरची मागणी पूर्ण करून या विषयाला पूर्णविराम द्यावा,अशी विनंती केल्यानंतर बरीच खडाजंगी उडाली. ह्यात शेवटपर्यंत पेडणेकरांनी आपली भूमिका ठाम ठेवल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता दुसरी बैठक बोलावून त्यात अंतीम निर्णय जाहीर करू,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आटोपती घेतली.

संध्याकाळच्या बैठकीत तोडा आणि फोडा राजकारण

कालपरवापर्यंत संपूर्ण तालुक्यातील लोकांना टॅक्सी व्यवसायात संधी देण्याची भाषा करणाऱ्या सरकारने अचानक संध्याकाळच्या बैठकीत भूपीडित पंचायत क्षेत्रातील लोकांनाच येलो-ब्लॅक टॅक्सी सेवेचा लाभ देण्याचा प्रस्ताव ठेवला. किती लोक टॅक्सी व्यवसाय करतील,असे विचारल्यावर एका सरपंचांनी दोन हजार असा आकडा सांगितल्यावर मुख्यमंत्रीही अचंबित झाले. तरिही भूपीडितांसाठी विशेष योजना राबवण्याच्या नव्या ऑफर्सची बरसात या बैठकीत सुरू झाली. येलो- ब्लॅक टॅक्सी व्यतिरीक्त ब्लू टॅक्सी असा प्रस्ताव पुढे करून हा काऊंटर जीईएल चालवणार,असाही प्रस्ताव पुढे करण्यात आला.

भूपीडित, पेडणे मतदारसंघ आणि पेडणे तालुका या तऱ्हेने तीन गट तयार करून सरकारने टॅक्सी संघटनांत फुट पाडण्याचे प्रयत्न चालवले असता शिष्टमंडळातील एकाने नाराज बनून बैठकीतून काढता पाय घेतला. किती जणांना टॅक्सी व्यवसाय करायचाय त्यांनी सरपंचांकडे नावनोंदणी करावी आणि हा आकडा सरकारला द्यावा असेही ठरविण्यात आले. या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय कळवू,असे सांगून अखेर या शिष्टमंडळाने हा विषय संपवला. बैठकीनंतर पर्यटनमंत्री रोहन खवंटे आणि वाहतुकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांच्यावर आंदोलन संपल्याचे मिडियाकडे जाहीर करा,असे वक्तव्य करण्यासाठी बराच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. शिष्टमंडळासमोरच आमदाराचा पाण उतारा करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. हा सगळा प्रकार शिष्टमंडळासमोर घडल्याने या टॅक्सी व्यवसायाच्याबाबतीत सरकारातील काही मंत्र्यांचे स्वहित दडल्यानेच येलो- ब्लॅक टॅक्सी काउंटरला विरोध आणि अॅपसेवेत सामील होण्यासाठीचा अट्टाहास केला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पेडणेकर टॅक्सी व्यवसायीक सतर्क बनले आहेत.

ताम्हणकर नाराज

सरकारने पेडणेकरांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी काही एजंटांना नेमले होते,असा आरोप सुदिप ताम्हणकर यांनी केला.

आपल्या अनुपस्थितीत चर्चेला तयार नसलेल्या टॅक्सी व्यवसायीकांना एका पत्रकाराने चर्चेसाठी तयार केले आणि आपल्याला डावलून मुख्यमंत्र्यांकडे नेले,अशी टीकाही त्यांनी केली. हा सगळा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. पेडणेकरांना आपली मदत लागली तर आपण अवश्य त्यांच्यासाठी असेन पण त्यांना सरकारचे दलाल मोठे वाटत असतील आणि ते हा प्रश्न सोडवू शकतात,असे वाटत असेल तर त्यांनी खुश्शाल त्यांच्यासोबत जावे,असा टोलाही त्यांनी हाणला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!