कृषी वार्ता : प्रीयोळची प्रसिद्ध “शार्लेट रोथचाइल्ड” अननस आणि हवामान बदलाचा परिणाम

ऋषभ | प्रतिनिधी
प्रियोळ,20 मे : गोवा हा इवलासा प्रदेश. प्रथमदर्शी जरी आपली अर्थव्यवस्था पर्यटन आणि मायनिंगवर आधारित असल्याचे दिसून येत असले तरी, ग्रामीण भागातला मोठा प्रवर्ग आजही शेतीवर आपल्या गरजा भागावतोय. गोव्यातल्या अनेक भागात विविध प्रकारची पिके घेतली जातात. मिरची, वांगी, तवशी-पडवळ, माठाची तांबडी भाजी, मूळयाची भाजी, टोमेटो, तोंडली, वाल-हळसाणे, कांदे इत्यादी पिके आपणास गावागावातल्या शिवारात ज्यास स्थानिक भाषेत ‘रोपे’ किंवा ‘वायंगण’ म्हणून ओळखले जाते, तेथे नजरेस पडतात.

आपल्या गोव्याची माती तशी सुपीक, यात उगवणारी पिके आणि त्याची चवच न्यारी. पण गेल्या काही वर्षांत जास्त पीक घेण्याच्या नादात स्थानिक शेतकरी जेव्हा रसायनांच्या वापरास प्राधान्य देऊ लागला तेव्हा जमिनीचा कस गमावून बसला. पण अनेक होतकरू तरूण आपल्या भरपगारी नोकऱ्या सोडून पुनः आपल्या मातीशी एकरूप होत गावात स्थायिक होऊ लागले आणि त्यांनी रसायनिक खते आणि तत्सम गोष्टींना हळू हळू फाटा देत, पूर्णतः सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करीत काही अभिनव सिंचन कल्पनांचा वापर सुरू केला. परिणाम स्वरूप आज आपण गावागावातून जाताना ज्या काही बागायती दिसतात त्यात आपणास चिकू, केळ्याचे विविध प्रकार, फणस-निरपणस इथपासून चक्क ग्रीन हाऊस इफेक्टचा वापर करून स्ट्रॉबेरीचे देखील उत्पादन घेतल्याचे दिसून येते.

साळगांवचे हळसाणे, काणकोणची मिरची, फोंड्याची तवशी त्याचप्रमाणे प्रसिद्ध आहेत ती प्रियोळची अननस. प्रियोळमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात अननसांचं पीक घेतात. कॅमीकल खतांचा वापर न करता सेंद्रीय खतांद्वारे शेतकऱ्यांकडून घेतलं जाणार हे अननसाच पिक त्याच्या गोड चवीमुळे प्रसिद्ध आहे. सद्या प्रियोळमध्ये अननसांचा सिझन सुरु झालाय. गोव्यात ज्या अननस प्रजातीचे पीक घेतले जाते त्यास “शार्लेट रोथचाइल्ड” म्हणून ओळखले जाते.
पण असे अनेक अभिनव प्रयत्न करणारे प्रीयोळचे उद्यमशील शेतकरी दशरथ बेतोडकर यांच्यानुसार लहरी हवामानामुळे अननसाचे पीक हे तब्बल 80 टक्के घसरले आहे. त्यात पाण्याची कधी कधी जाणवणारी टंचाई वगैरे गोष्टी त्या अडचणीत भर टाकतात.

अननस हे भारतातील महत्त्वाच्या व्यावसायिक फळ पिकांपैकी एक आहे. ईशान्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा आणि महाराष्ट्रात अननसाचे पीक मुबलक प्रमाणात घेतले जाते. अननसाची लागवड प्रायद्वीप भारतातील अतिवृष्टी आणि दमट किनारी प्रदेश व ईशान्येकडील मॅग्नेशियमची उपयुक्त मात्रा असलेल्या डोंगराळ प्रदेशांपुरती मर्यादित आहे. मध्यम पर्जन्यमान आणि पूरक सिंचनासह, व्यवसाईकरित्या देखील त्याची लागवड केली जाऊ शकते. हे देखील तितकेच खरे आहे की साजेसे पूरक हवामान जर त्यास नाही मिळाले तर मात्र दशरथ बेतोडकर यांनी सांगितल्या प्रमाणे उत्पादन खुंटण्याची दाट शक्यता असते.
