कळंगूटमधील दलालांवर उठला धडक कारवाईचा आसूढ; समाज विघातक घटकांचे धाबे दणाणले

ऋषभ | प्रतिनिधी
कळंगूट: सद्यस्थितीत गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला लागलेली सर्वात मोठी कीड जर कुठली असेल तर ती म्हणजे संपूर्ण गोव्यात फिरणारे अनधिकृत दलाल आणि इतर समाजविघातक घटक. यांच्यामुळे अनेक वेळा पर्यटक आणि पर्यायाने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक वेळा पोलिसांनी कारवाई करून देखील या दलाल आणि समाज विघातकांना योग्य तो बोध होत नाही आणि त्यांचे अवैध धंदे चालूच राहतात, ज्यामुळे गोव्याची अनाहूतपणे बदनामी होते आहे.

काल शुक्रवारी 28 एप्रिल 2023 रोजी, कळंगूट पोलिस स्थानकाच्या हद्दीत अशाच समाजविघातक घटकांवर धडक कारवाईचा आसुढ ओढला गेला. या धडक कारवाईत तब्बल 30 दलाल जे अनेक अवैध धंध्यात गुंतले होते, त्यांस ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर अनेक पर्यटकांना ड्रग्स, मसाज पार्लर आणि शरीरविक्रीचे आमिष दाखवून त्यांस लुटल्याचेही गंभीर आरोप आहेत.

सदर मोहिम पार पाडताना कळंगूट पोलिसांनी डिचोली, वाळपई आणि इतर पोलिस स्थानकांतील पोलिस कर्मचारी जे कळंगूट पोलिस स्थानकाशी संबंधीत नव्हते त्यांची मदत घेऊन त्यांस देशी पर्यटक म्हणून या दलालांचा वावर असलेल्या भागात पाठवले. कळंगूट पोलिस स्थानकांतील पोलिसांना हे सगळे दलाल कदाचित ओळखतील आणि सावध होतील हा तर्क लावला गेला असावा अशी स्थानिकांची भावना आहे. सदर मोहिमेमुळे समाज विघातक घटकांवर कायद्याचा वचक बसेल अशी आशा किनारी भागातील अनेक स्थानिक व्यवसायीकांनी व्यक्त केली. ताब्यात घेतलेल्या दलालांवर यथायोग्य कारवाई केली जाईल अशी ग्वाही नॉर्थ गोवा एस पी निधीन वाल्सन यांनी पत्रकारांना संबोधित करताना दिली.
